कानेगावचे बुद्ध विहार खुले करण्याच्या मागणीसाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या !

जिल्हा प्रशासनाने मागविला पोलिसांचा फौजफाटा
 
s

उस्मानाबाद  - लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील बुद्ध विहार गेल्या अनेक वर्षांपासून तेथील काही गावगुंडांनी बंद केले आहे. हा बौद्ध समाजावर प्रचंड मोठा अन्याय असून ते खुले करण्यात यावे या मागणीसाठी कानेगाव येथील बौद्ध बांधवांनी किंग कोब्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दि.२४ ऑगस्ट रोजी ठिय्या मांडला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा मागविला.

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे भूकंपापूर्वी बौद्ध समाजाची वस्ती होती. त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधकाम करण्यात आले आहे.  मात्र भूकंप नंतर इतरत्र पुनर्वसन झाल्यामुळे स्थलांतर करावे लागले. परंतू त्या ठिकाणी असलेले बौद्ध विहार तेथील काही गावगुंडांनी अतिक्रमण करून बंद केले आहे. ते खुले करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र निर्ढावलेल्या जिल्हा प्रशासनाने केवळ होकारार्थी उत्तरे देऊन या समाज बांधवांची बोळवण केली आहे. विशेष म्हणजे या वादातूनच मागील ५ महिन्यांपूर्वी अंकुश गायकवाड या युवकाचा फासावर लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. त्यानंतर बौद्ध विहार  किंवा त्या समोरील जागा बौद्ध समाजास देण्याचे जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले. मात्र अद्याप त्यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देखील जिल्हा प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या समाजाला न्याय देण्यासाठी तेथील बौद्ध समाजातील महिला-परुष बांधवांनी आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही अशी ताठर भूमिका मांडत त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडला. 

यावेळी शांताबाई माने, चतुराबाई माने, साधना सोनवणे, रूपाबाई माने, उर्मिला गायकवाड, रेश्मा माने, जयश्री माने, मीराबाई माने, सखुबाई माने, रेखा माने, साखरबाई कांबळे, लतिका माने, इंदू माने, गंगाबाई कांबळे, कोंडाबाई माने, त्रिशीला माने, जयश्री कांबळे, सविता कांबळे, सुशीला माने, संदीप कटबु, गणेश वाघमारे, रिपाइंचे दादा शिंगाडे, धनराज कांबळे, बाबासाहेब माने, कल्याण माने, शिवाजी माने, ज्योतिबा सोनवणे, संदिपान कांबळे, अरुण माने, फुलचंद गायकवाड, प्रतीक माने, पंचशील माने, तानाजी माने, गणेश कांबळे, रामचंद्र कांबळे आदीसह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web