मराठवाड्याच्या हक्काच्या उर्वरीत पाण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक !

 - आ. राणाजगजितसिंह पाटील
 
s

उस्मानाबाद  - कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काच्या उर्वरीत पाण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे व कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प या शासनाच्या प्राधान्यक्रमावर असून त्यासंदर्भातील निर्णय गतीने घेतले जातील असे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधान सभेत आश्र्वस्त केल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पावर आज विधान सभेत उपस्थित लक्ष वेधीवर पूरक प्रश्न उपस्थित करताना आ. पाटील म्हणाले की, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मराठवाड्यासाठी व  खास करून उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.  ना. देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला खूप मोठी गती दिली होती, मोठ्या प्रमाणात कामे देखील सुरू केली. मात्र हा केवळ ७ किंवा २३.६६ टीएमसी चा विषय नसून या पेक्षा कितीतरी अधिक पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे, या बाबत मा उपमुख्यमंत्री कधी पर्यंत बैठक घेतील असा प्रश्न उपस्थित केला.

या महत्वपूर्ण विषयावर बोलताना उप मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याचा या पाण्यावर मोठा अधिकार आहे, मात्र पाणी तंटा लवादाचा निर्णय येई पर्यंत वाढीव पाण्या बाबत निर्णय घेता येणार नसल्याने किमान जे ७ टीएमसी पाणी आता उपलब्ध आहे, त्याच नियोजन केलं पाहिजे म्हणून आपण ७ टीएमसी च्या नियोजना संदर्भातले निर्णय घेतले. त्याला गती दिली, आता २३ टीएमसी मधील उरलेले किंवा जे काही शिल्लक असेल या संदर्भात लवादाच्या प्रक्रीयेला गती देऊन कशाप्रकारे सकारात्मकतेने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवून देता येईल याचा प्रयत्न तातडीने केला जाईल, असे सभागृहाला आश्वसित केले.

महाराष्ट्रातील कृष्णा खो-याच्या एकुण क्षेत्राच्या मराठवाडा प्रदेशातील क्षेत्र ८.३९% आहे व हे विचारात देता,  मराठवाड्याला २३.६६ ऐवजी जवळपास ६१ टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. डॉ पदमसिंहजी पाटील साहेब यांनी मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी मंजूर करून घेतले होते. या प्रकल्पाची कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशी घातलेली जोड यामुळे प्रकल्पाचे काम २००७ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र निधीची कमतरता व पर्यावरणाच्या मान्यतेच्या अभावामुळे प्रकल्प रेंगाळत गेला. २०१४ नंतर ना. देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळवुन घेतली व पैशाची उपलब्धता करत खूप मोठी गती दिली व मोठ्या प्रमाणात कामे देखील सुरू केली. २३.६६ टीएमसी मधील १७.९८ टीएमसी पाणी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी व ५.६८ टीएमसी बीड जिल्ह्यासाठी आहे.कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या प्रथम टप्पा ७ टीएमसी पाणी वापर तीन उपसा योजनाव्दारे नियोजीत आहे.

उपसा सिंचन योजना क्रमांक १ अंतर्गत ३.०८ टीएमसी पाणीवापर व १४९३६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असुन लाभ क्षेत्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, भुम, वाशी, कळंब या तालुक्याचा समावेश आहे.

उपसा सिंचन योजना क्रमांक२ अंतर्गत २.२४ टीएमसी पाणीवापर व १०८६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असुन लाभ क्षेत्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा व उमरगा या तालुक्याचा समावेश आहे.उपसा सिंचन योजना क्रमांक ३ अंतर्गत १.६८ टीएमसी पाणीवापर व ८१४७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असुन लाभ क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्याचा समावेश आहे. या प्रकारे मराठवाडयातील उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील ३३९४५ हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे, असेही आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

From around the web