नळदुर्ग येथील प्रस्तावित एमआयडीसी मध्ये शेतमाल मुल्य वृध्दी व प्रक्रीया उद्योगावर भर देणार

– आ.राणाजगजितसिंह पाटील 
 
s

नळदुर्ग -  शहराला मोठा इतिहास असून पूर्वी ते विभागीय मुख्यालयाचे ठिकाण होते. शहर व परिसरातील गावांची गैरसोय लक्षात घेऊन नळदुर्गला अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या भागात रोजगार निर्मितीवर देखील विशेष लक्ष देण्यात येत आहे. या अनुषंगाने शहरालगत अलियाबाद शिवारामध्ये जवळपास ३०० एकर क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याबाबत उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरल्या प्रमाणे एमआयडीसीच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडुन जागेची पाहणी करण्यात आली आहे.

या ठिकाणी पडीक जमीन मोठ्या प्रमाणात उलपब्ध असून अनेक शेतकऱ्यांनी एमआयडीसीला जागा देण्यास सहमती दर्शविली आहे. या जागे लगत दोन तलाव असून बोरी धरण देखील जवळच आहे. सदरील क्षेत्र पुणे - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत असून दळणवळण,वीज व पाणी या मूलभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना संपादीत जमिनीसाठी शासकीय मुल्यांकन दराच्या ४ पट दराने मावेजा दिला जातो, तसेच विकसित क्षेत्रातील वाणिज्य वापराची १०% जमीन अल्प दराने दिली जाते.जिल्हयात जवळपास २०० शेतकरी उत्पादक कंपनी असुन या माध्यमातुन येथे शेतमालाची मुल्य वृध्दी व कृषी प्रक्रीया उद्योग उभारण्यावर भर राहणार आहे.  

s

जिल्ह्यात १० हजार मेगा वॉट सौर ऊर्जा निर्मितीसह २० हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या जागेबद्दल समाधान व्यक्त केले असून ही जागा औद्योगिक वसाहतीसाठी उत्तम असल्याचा अभिप्राय दिला आहे. येथे औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांसह परिसरातील युवकांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

From around the web