तेरणा कारखान्याचा भैरवनाथ समुहाकडे ताबा देण्याची कार्यवाही पूर्ण
उस्मानाबाद - मराठवाड्यातील सर्वात मोठा सहकारी कारखाना अशी ओळख असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा 25 वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने भैरवनाथ समुहाकडे दिला आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला तेरणा कारखान्याच्या सभासदांसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवार, दि. 2 जानेवारी रोजी भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवाजीराव सावंत आणि जिल्हा बँकेच्या अधिकार्यांनी कारखानास्थळी जाऊन ही कार्यवाही पूर्ण केली.
निविदा प्रक्रियेत अडकलेल्या कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करुन ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार आणि कारखान्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील व्यावसायिकांना दिलासा मिळावा यासाठी भैरवनाथ समुहाचे सर्वेसर्वा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगरने निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. डीआरएटी कोर्टाच्या निकालानंतर अखेर सोमवारी तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ समुहाकडे देण्याच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवाजीराव सावंत, व्हा.चेअरमन अनिल सावंत, कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, तालुकाप्रमुख अजित लाकाळ पाटील, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील, राहुल वाकुरे पाटील, यांच्यासह कारखान्याचे सभासद, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देणार - शिवाजीराव सावंत
तेरणा साखर कारखान्यावरील कर्जामुळे जिल्हा बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला. त्यामुळे तब्बल 12 वर्ष या कारखान्याच्या सभासद शेतकर्यांसह ऊस उत्पादकांचे हाल झाले. तेरणा कारखाना आता भैरवनाथ शुगरकडे आल्यामुळे तेरणाच्या सभासदांसह कामगार, परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून या कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देणार असल्याची प्रतिक्रिया भैरवनाथ समुहाचे शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केली.