'तेरणा’ची धुरा तानाजी सावंत यांच्या भैरवनाथकडेच ... 

 
terna

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी  येथील तेरणा साखर कारखाना २५ वर्षांसाठी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अधिपत्याखालील भैरवनाथ शुगरकडेच राहणार आहे. या संबंधीचा निर्णय गुरुवारी (दि.२२) डीआरएटी न्यायाधिकरणाने दिला. त्यामुळे आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर तेरणा कारखाना परिसरात कर्मचाऱ्यांनी व ढोकी येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

तेरणा साखर कारखाना ३१२ कोटी रुपये कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. यात २५ नोव्हेंबर २०२१ रोजी तेरणा कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला. या प्रक्रियेच्या विरोधात देशमुख यांच्याशी संबंधित ट्वेंटीवन शुगरने जिल्हा बँकेने निविदा प्रक्रिया नियमानुसार राबवली नाही.

तसेच ट्वेंटीवनची निविदा इतरांपेक्षा जास्त रकमेची असताना सहभागापासून रोखल्याचा आरोप करुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया प्रकरण डीआरटी न्यायाधिकरण ते उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात, परत डीआरटी न्यायाधिकरणात चालू होते. डीआरटी न्यायाधिकरणाने शुक्रवारी दि. १७ जून रोजी ट्वेन्टीवन शुगर-ची याचिका निकाली काढली.

तसेच तत्कालीन जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने राबवलेली प्रक्रिया योग्य ठरवल्याने तेरणाचा ताबा भैरवनाथ शुगरला मिळणार होता. परंतू २७ जून रोजी डीआरटीच्या निर्णयाविरोधात ट्वेन्टी वन शुगरने डीआरएटी (ऋण वसुली अपिलीय न्यायाधिकरण) मध्ये धाव घेतली. गेल्या सहा महिन्यापासून डीआरएटी मध्ये तेरणा संदर्भात वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, अवसायक तेरणा साखर कारखाना, ट्वेंटी वन शुगर व भैरवनाथ शुगर यांच्यात तेरणाच्या निविदा प्रक्रियेवरून वाद प्रतिवाद झाले. आज यावर डीआरएटी न्यायालयाने अंतीम निकाल दिला.

सहा दिवसाचा मनाई आदेश

डीआरटी कोर्टाने जिल्हा बँकेची निविदा प्रक्रिया योग्य ठरवत ट्वेंटीवनची याचिका फेटाळली असली, तरी ट्वेंटीवनच्या मागणीनुसार उच्च न्यायालयात या निकालाच्या विरोधात अपील करण्यासाठी सहा दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. या अवधीत जिल्हा बँकेने तेरणा कारखाना संदर्भात पुढील कोणताही निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

तेरणा साखर कारखाना चालू करण्याच्या मागणीसाठी आंदोलने झाली. तेरणा बचाव समितीची स्थापना झाली. या समितीतून बाहेर पडल्यानंतर अजित खोत यांनी आम आदमी पक्षाच्या वतीने माजी मंत्री अमित देशमुख व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गावात जाऊन ठिय्या आंदोलन केले होते.

तेरा महिन्यानंतर निर्णय मिळाला. कारखाना कुणी ही चालवा, तो चालू झाला पाहिजे ही भावना सभासदांची आहे. जिल्हा बँकेने तातडीने पावले उचलून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर कडे देण्याची मागणी सभासद, शेतकरी व कामगारांतून होत आहे.

ज्याच्याकडे “तेरणा’ची सत्ता त्यांच्याकडे जिल्ह्याच्या राजकारणाची चावी, असे समीकरण होते. डॉ. सावंत यांच्या अधिपत्याखालील भैरवनाथ शुगरच्या बाजुने तेरणा कारखान्याचा निकाल लागल्याने उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघासह लातूर तालुक्यातील काही भाग असे १२७ गावांचे कार्यक्षेत्र व ३४ हजार सभासद असलेल्या तेरणावर वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याने सावंत यांचे बळ वाढणार.

निविदा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जिल्हा बँकेचे नूतन संचालक मंडळाने तेरणा कारखान्याची निविदा प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी डीआरटी व डीआरएटी न्यायाधिकरणाकडे केली होती. परंतु डीआरटी पाठोपाठ डीआरएटीनेही जिल्हा बँकेची फेरनिविदेची मागणी फेटाळून लावली.

निविदा प्रक्रियेतून पाच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा तेरणा साखर कारखाना भैरवनाथ शुगरने पंचवीस वर्षांसाठी घेतला आहे. त्यासोबतच कारखान्याची २६२ एकर जमीन तसेच ४० किलो लिटर क्षमतेचा आसवानी प्रकल्प, १४ मेगावॅटचा वीज प्रकल्प भैरवनाथ शुगरच्या अधिपत्याखाली २५ वर्ष आला. गेल्या दहा वर्षापासून बंद असलेल्या तेरणा कारखान्यास ऊर्जितावस्था प्राप्त होणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

From around the web