उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नाकारली
उस्मानाबाद - उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नाकारली आहे. त्यामुळे चालू वर्षी उस्मानाबादचे मेडिकल कॉलेज सुरु होण्याची शक्यता मावळली आहे.
जिल्हावाशियांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता नाकारल्याने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रीगिरीशजी महाजन व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव विजय सौरभ यांच्याबरोबर चर्चा करून त्रुटींची पूर्तता दर्शविणारा फेर प्रस्ताव तातडीने दाखल करण्याचे व शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचे ठरल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
अनेक वर्षाच्या संघर्षानंतर सन २०१६ साली उस्मानाबाद येथील महाआरोग्य शिबिर दरम्यान तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली, त्या अनुषंगाने शासन स्तरावर प्रस्ताव तयार करून समिती गठीत करण्यात आली. समितीने तपासणी करून सकारात्मक अहवाल दिला मात्र तद्नंतर सरकार बदलल्याने हा विषय अनेक दिवस प्रलंबित राहिला. बऱ्याच पाठपुराव्यानंतर दि.२७.०१.२०२१ रोजी याबाबतीतला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. पुरेशी तयारी न करता तत्कालीन प्रशासनाकडून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समिती समोर हा विषय जाऊ दिला. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समिती (NMC) ने उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेस दि.०४.०२.२०२२ रोजी भेट देऊन पाहणी केली व यात काही गंभीर त्रुटी काढल्या. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन वैद्यकीय मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र महाविकास आघाडी सरकार कडून हा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही व दि.२५.०८.२०२२ रोजी अयोगाने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मंजूरी नाकारल्याचे पत्र पाठविले.
विषयाचे महत्व व गांभीर्य लक्षात घेवून वैद्यकीय शिक्षण मंत्री . गिरीशजी महाजन यांना या सर्व बाबीं विषयी अवगत करण्यात आले व आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव श्री. विजय सौरभ यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत ठरल्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता दर्शविणारा अहवाल मंगळवार दि.०६.०९.२०२२ पर्यंत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे सादर करण्याचे ठरले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त श्री. विरेंद्र सिंग यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबादचे अधिष्ठाता डॅा. संजय राठोड यांना या विषयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
सदरील वैद्यकीय महाविद्यालयाला याच वर्षी मान्यता मिळवून सन २०२२-२३ मध्येच प्रवेश सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातील असे ना. महाजन यांनी आश्वासित केले आहे. फेर प्रस्ताव दाखल होताच या विषयाच्या पाठपुराव्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांना भेटणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.