यात्रा व्यवस्था आणि बंदोबस्ताच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पूर्व तयारी आढावा बैठक
उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाने कोरोना बाबतचे निर्बंध शिथील केले असले तरी, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या असल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने प्रथमोपचार केंद्रे चालू करावीत तसेच पुरेशा प्रथमोपचार पेट्या पोलिस विभागास देण्यात याव्यात व मंदिरातील अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधवांना कोविड लसीकरण करण्यासाठी मंदिर परिसरात कॅम्प आयोजित करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले. श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत शारदीय नवरात्र महोत्सव 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरा होत असून महोत्सव कालावधीत यात्रा व्यवस्था आणि बंदोबस्ताच्या नियोजना संदर्भात पूर्व तयारी बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी श्री.दिवेगावकर बोलत होते.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, उपजिल्हाधिकारी पुरवठा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हालकुडे, तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तांदळे, मंदिर संस्थान प्रशासनाच्या तहसिलदार योगिता कोल्हे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन मंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी, मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि महंत उपस्थित होते.
राज्य शासनाने मंदिर उघडण्या अनुषंगाने निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मंदिर संस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे पार पडली. गेली दोन वर्षे कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी तीन दिवसीय यात्रा यावर्षी भरवण्यात येणार आहे. यानिमित्ताने सर्व पूजा आणि विधी होणार असून भाविकांनी शासनाने निर्बंध उठवलेले असले तरी कोरोनाचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
विद्युत वितत्रण कंपनीने शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, महोत्सव कालावधीत एक उपअभियंता व दोन वायरमन यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात यावी. नवरात्र महोत्सव कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिरात नियुक्त कर्मचारी 24 तासांकरीता उपस्थित राहतील, तुळजापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा तसेच रामदरा तलावाखालील विहीरीवरचा पाणीपुरवठा ( मंदिर पाणी पुरवठा) येथील विजपुरवठा खंडीत होणार नाही, तसेच नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात यावे. नवरात्र महोत्सव सुरु होण्यापुर्वी शहरातील सर्व ठिकाणची देखभाल व दुरुस्ती करुन घ्यावी. ट्रान्सफॉर्मर लोड क्षमतेपेक्षा जास्त नसावा, फ्युज व्यवस्थीत ठेवावेत, ट्रान्सफॉर्मर स्पेअरमध्ये ठेवावेत, केबल उघडया राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
नवरात्र महोत्सवापुर्वी विदयुत मेंटेनन्स पुर्णतः करुन घ्यावा व यात्रा काळात तांत्रिक बिघाड होऊन जिवीत व वित्तहानी होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. शहरातील विजेच्या केबल, बॉक्स, मेन बॉक्स, उघडे राहणार नाहीत तसेच धोकादायक राहणार नाहीत याबाबत म. रा. वि. कंपनीने दक्षता घेणे आवश्यक आहे. विशेषतः दर्शन मंडप इमारतीचे पाठीमागे असणारा डी. पी. व केबल्स याची पाहणी करुन आवश्यक सुधारणा करणे. धोकादायक वायर, केबल, पोल इ. त्वरीत दुरुस्त करुन घ्याव्यात तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर उघडया असणा-या केबलची पाहणी करुन सर्व वायरींग व डी.पी. सुस्थितीत व तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का याची तपासणी करुन कार्यकारी अभियंता यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र तात्काळ अध्यक्ष यांच्याकडे सादर करण्यात यावे असे सुचित केले.
नगर परिषदेचे रस्त्यावरील विद्युत दिव्यांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडून नगर परीषदेस सहकार्य करुन विद्युत दिवे लावून घ्यावेत, महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी तसेच रस्ते या ठिकाणी नियमीत पेक्षा अधिक प्रकाशमान होईल यादृष्टीने नवीन लाईट व्यवस्था करावी व तुळजापूर शहराकडे येणारे सर्व रस्त्यांची दुरुस्ती नवरात्र महोत्सव सुरु होण्यापुर्वी करून घ्यावी. शहराकडे येणारे सर्व रस्त्याचे बाजुचे गवत काढून घ्यावे व त्याठिकाणी मुरुम टाकून घ्यावा व त्यावर रोलींग करुन घ्यावे जेणेकरुन चालत येणारे भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी अधिकारी-कर्मचारी यांना दिल्या.