साखर सहसंचालकांनी घेतली आंदोलनाची दखल
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर आणि एन साई मल्टीस्टेट सोसायटीकडून फसणूक केली जात असल्याप्रकरणी उपोषणास बसलेल्या उत्रेश्वर चंद्रकांत जाधवर या शेतकर्याच्या आंदोलनाची प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दखल घेऊन यासंदर्भात नॅचरल शुगर अॅन्ड अलॉइड इंडस्ट्रीजच्या चेअरमन व जनरल मॅनेजर यांना पत्र पाठवून निवेदनकर्त्याच्या मागणीवर उचित कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु ज्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाधवर हे उपोषणास बसले आहेत, त्या कार्यालयाने मात्र पाचव्या दिवशीही या उपोषणाची दखल घेतली नाही. रविवारी (दि.15) पाचव्या दिवशी देखील हे उपोषण सुरुच होते.
उत्रेश्वर चंद्रकांत जाधवर यांनी कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर आणि एन साई मल्टीस्टेट सोसायटीकडून अर्थसाह्य घेऊन ऊसतोडणी यंत्र खरेदी केले होते. या प्रकरणात सुरुवातील भरलेल्या 45 लाख रुपये डाऊन पेमेंटची नोंद कर्जखात्यात घेतली गेली नाही. त्यामुळे व्याजचा भुर्दंड वाढत असल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करुन न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी दि.11 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या प्रकरणात प्रकरणात जाधवर यांनी साखर सहसंचालक कार्यालयास देखील पत्राद्वारे अवगत करुन आमरण उपोषण करणार असल्याचे कळविलेले होते. 11 मे रोजी उपोषण आंदोलन सुरु केल्यानंतर 12 मे रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी नॅचरल शुगर अॅन्ड अलॉइड इंडस्ट्रीजचे चेअरमन व जनरल मॅनेजर यांच्या नावे पत्र पाठवून उपोषणकर्ते उत्रेश्वर जाधवर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ उचित कार्यवाही करुन त्याचा अहवाल सहसंचालक कार्यालयास पाठवावा, असे निर्देशित केलेले आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपोषणकर्ते उत्रेश्वर जाधवर यांना कोणतेही उत्तर न मिळालेले नाही. त्यामुळे आज रविवारी पाचव्या दिवशी देखील जाधवर यांचे उपोषण आंदोलन सुरुच होते. त्यामुळे प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे का? असा प्रश्न आंदोलनकर्ते जाधवर यांनी उपस्थित केला आहे.