सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्यासाठी राज्याचा वाटा द्या…

    ⁃   केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
 
rana

उस्मानाबाद - आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेवून सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद या रेल्वे मार्गाचे महत्व विषद करत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घोषित केलेला हा रेल्वे मार्ग राज्याकडून निधीची तरतूद होत नसल्याने रेंगाळत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी देखील याबाबत रेल्वे मंत्र्यांना पत्र देवून  या प्रकल्पासाठी अधिकचा निधी देवून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे तीर्थक्षेत्र रेल्वे मार्गाने जोडून येथील अर्थकारणाला गती देण्याच्या उद्देशाने देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी साहेबांनी तुळजापूर येथील सभेत सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग मंजुरीचा शब्द दिला होता व हा शब्द पाळत या प्रकल्पाला मंजुरी देत सन २०१९ मध्ये या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले होते. राज्यातील इतर रेल्वे मार्गाच्या प्रकल्पा प्रमाणे केंद्र शासनाचा ५०% व राज्य सरकारचा ५०% हिस्सा या प्रमाणे रु. ९०४.३२ कोटी अंदाजपत्रकीय किमतीच्या  एकूण ८४.४४ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गास मंजुरी देण्यात आली होती. 

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा ५०% हिस्सा दिला जात नसल्याने परंतु राज्यातील इतर रेल्वे प्रकल्पांना आर्थिक तरतूद केली जात असल्याने शिवसेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीतच आखडता हात का घेतेय ? याबाबत विधान सभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी 'सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.' असे अतिशय धक्कादायक, धादांत खोटे व सभागृहाचीही दिशाभूल करणारे उत्तर दिल्यामुळे रेल्वे मार्गाच्या कामात आणलेला अडथळा दूर करण्यासाठी आ. पाटील यांनी  परिवहन मंत्री ना. अनिल परब साहेब यांचे विरुद्ध महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाची सूचना मांडलेली आहे.
 
रेल्वे मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या प्रकल्पासाठी रु.20 कोटी व चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी रु. 10 कोटी ची तरतूद  केलेली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ६६० हेक्टर खासगी व शासकीय जमिनीचे संपूर्ण प्रस्ताव सोलापूर व उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील या प्रकल्पासाठी सम प्रमाणातील हिस्स्याची रक्कम रु. ३० कोटी जमा करून भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने करण्याची विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लिहीलेल्या या पत्राच्या मुळे मुख्यमंत्री योग्य दखल घेत राज्याचा हिस्सा लवकर जमा करून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या या प्रकल्पाला सहकार्य आता तरी करतील अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली.
 

From around the web