घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

भाविकांची दर्शनासाठी गर्दी, 2 वर्षांनंतर भक्तांमध्ये आनंदी वातावरण
 
s

तुळजापूर  - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री  तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे सोमवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी  करण्यात आले.

               त्यानंतर घट कलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

s

मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसूनच घ्यावा, असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

    यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, अक्षय पाटील,एस.के कदम,संजय सोंजे महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

घरोघरी केली घटस्थापना

तत्पूर्वी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांच्यासह मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजीत सिंह पाटील, तुळजाभवानीचे महंत, पूजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर घरोघरी घटस्थापना करण्यात आली.

s


पावसात भाविकांचे लोटांगण

गाभाऱ्यात पहाटे 4.00 वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थाचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसांच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभावानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले. महाराष्ट्रासह राज्यातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात तुळजापूरात दाखल झाले होते. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तानींही आई तुळजाभवानीचे दर्शने घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

fg

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

कोरोनामुळे गेली दोन वर्ष सगळ्या सणांवर सावट होते. कोरोनामुळे कोणतेही सणवार साजरे करण्यात आले नाही. असे असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने सगळे सण आनंदाने साजरे होत आहे. आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे आज प्रसन्न आणि आनंदीमय वातावरण आहे. जगभरात नवरात्रोत्सव अगदी आनंदाने साजरा होत आहे.


तुळजाभवानी मातेचे महत्व

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री. शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती चल मूर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.

From around the web