सरपंच पतीच्या मनमानीला वरवंटीच्या उपसरपंचासह सदस्य वैतागले !

पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे केली निवेदनाद्वारे तक्रार
 
d

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पतीच्या मनमानीला उपसरपंचासह सदस्य वैतागले असून ही मनमानी थांबविण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना आज (दि.23) निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे. एकुण 7 सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमधील उपसरपंचासह 5 सदस्यांनी सरपंचपतीच्या मनमानीविरोधात आवाज उठविल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निवेदनात म्हटले की, वरवंटी गावच्या सरपंच सौ.विमल शिवाजी देशमुख यांचे पती यांचे पती शिवाजी पंढरी देशमुख हेच ग्रामपंचायतच्या कामकाजात सतत हस्तक्षेप करुन मनमानी करत आहेत. ग्रामपंचायतच्या ठराव व इतर कागदपत्रांवर सही सुद्धा सरपंचाचे पती हेच करत आहेत.सदस्यांची मासिक सभा न घेता ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी प्रोसिडिंग बुक पाठवून सह्या करण्यास भाग पाडले जाते. याबाबत विचारणा केली तर सदस्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, धमकावणे, अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार सरपंचाचे पती नेहमीच करत आहेत. 

d

सरपंचपतीच्या या मनमानी कारभारामुळे गावाच्या विकासकामात अडथळे येत आहेत. याबाबत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना सतत अवगत केले तरी ते देखील कोणताही आक्षेप न घेता दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे संबंधित सरपंचपतीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर उपसरपंच इंद्रजित भागवत देशमुख, सदस्य अलका भारत सरपाळे, राणुबाई श्याम सरवदे, मैमुना हुसेन शेख, नरसिंग उद्धव डोंगरे यांची स्वाक्षरी आहे. 

From around the web