इनामी जमिनीची अवैधरित्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने नोटरीद्वारे लावली जातेय विल्हेवाट !

सरमकुंडी येथील मस्जिद व हजरत खाकशाह वली रहे.दर्गाह‌ देवस्थानची जमीनची खरेदी - विक्री 
 
s
जमिनीचे उत्खनन देखील जोरात अन् महसूल प्रशासन कोमात !

उस्मानाबाद  - देवस्थानची पूजाअर्चा करण्याबरोबरच देखभाल करण्यासाठी शासनाने इनामी जमिनी दिलेल्या आहेत. मात्र देखबाल करणाऱ्या व्यक्ती १०० वर्षांपूर्वी मयत झाल्या असून वारस म्हणून कोणाचीही नोंद महसूल दप्तरी लावलेली नाही. मात्र या जमिनीवर अवैधरित्या ताबा मिळवून त्या जमिनी मनमानीपणे रोटरीद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करून कोट्यवधी रुपये घशात घालण्याचा‌ तुघलकी कारभार वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील देवस्थान जमिनीचा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील‌ यास छुपा पाठिंबा असल्यामुळे हे धाडस खासगी व्यक्ती करीत आहेत. त्यामुळे  संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी‌ औरंगाबाद येथील राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथे मस्जिद व हजरत खाकशाह वली रहे. अ‌. दर्गाह या देवस्थानच्या इनामी जमिनी आहेत. त्या पूर्वीपासून इनाम म्हणूनच या देवस्थानच्या सेवेसाठी दिलेल्या असून त्याचा कायम उद्देश हा सेवेसाठी आहे. या इमान जमिनीची सनद, मुन्तकबमध्ये नोंद आहे व त्याची सध्या कोणाच्याही नावे विरासत मंजूर झालेले नाही. मूळ विरासतदार, मुतवल्ली हे मयत झाले आहेत. या जमिनीचे इनाम म्हणून नोंद महसूल दप्तरी शेतवार, खसरापाणी, इनाम पत्रक, गाव नमुना नं.०९ (१९५४) मध्ये नोंद आहे. तसेच गाव नमुना नं. ०३ मध्ये १३५० फसलीमध्ये देखील नोंद आहे. याबरोबरच या इनामी जमिनी ची नोंद ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळमध्ये आहे. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र  (गॅझेट) मध्ये देखील नोंद आहे. या जमिनीचे सर्वे नं. ८२, ८३ व १५६ मधील सर्व अ, ब, क, ड, इ, ई, उ, ऊ व फ या सातबारामध्ये नोंद आहे. 

s

तसेच ही जमीन देखील सेवेच्या अटीवर बहाल केली असून तसा उल्लेख गाव नमुना नं.०९ (१९५४) व मुन्तकबमध्ये देखील आहे. या दोन्ही देवस्थानचे मुतवल्ली हे मयत होऊन अंदाजे १०० वर्षे झालेले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांमध्ये अद्याप कोणाचीही विरासत मंजूर झालेली नाही. तसेच त्यांच्या पुढील वारस हे दोन्ही देवस्थानची योग्य पद्धतीने सेवा करीत नाहीत. या इनामी जमिनी या सेवेच्या अटीवर दिलेल्या असताना देखील मुतवल्लीचे पुढील वारस आपापल्या हिस्स्याप्रमाणे नियमबाह्यरीत्या अवैध पद्धतीने सदरील जमिनी या नोटरी करून विक्री करीत आहेत. वास्तविक पाहता सदर इनामी जमीन सदर देवस्थानच्या सेवेच्या अटीवर बहाल केलेल्या आहेत. 

त्यांना सदर जमिनी कसल्याही प्रकारे हस्तांतरित करण्याचा किंवा खरेदी विक्री, दान पत्र व करार पत्र करण्याचा अधिकार नसताना देखील हे लोक चुकीच्या पद्धतीने जमिनीचे हस्तांतर करीत आहेत. विशेष म्हणजे या जमिनीमध्ये अवैधरीत्या उत्खनन देखील करीत आहेत. हे सर्व प्रकार महसुली कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संगनमत करून चुकीच्या नोंदी घेऊन कार्य करीत आहेत. वास्तविक पाहता सदर देवस्थानच्या जमिनीच्या मूळ मुन्तकबमध्ये जे मुतवल्ली होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाची नियमाप्रमाणे सेवेच्या अटी व विरासत मंजूर करून घेऊन सदर देवस्थानची सेवा, पूजा अर्चा, दिवाबत्ती, देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे आहे, तशी झालेले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर या जमिनीचे विरासत सध्या कोणाची मंजूर नसेल तर इनामी जमीन या शासन दरबारी जमा करून त्याच्या एक साल लागण होणे गरजेचे आहे. तसे या जमिनीमध्ये झाल्याचे दिसून येत नाही. याउलट मुन्तकबमधील मुतवल्लीचे वारस हे चुकीच्या पद्धतीने या जमिनी हस्तांतरित करीत आहेत. 

ds

त्यामुळे सरमकुंडी येथील मस्जिद व हजरत खाकशाह वली रहे.अ. दर्गाह या दोन्ही देवस्थानचे विरासत तसेच इनाम जमिनीच्या बाबतीत सखोल चौकशी करून या जमिनी हस्तांतरित झालेल्या सर्व रेकॉर्ड व नोंदी रद्द करून अशा चुकीच्या हस्तांतर करणाऱ्या व चुकीच्या नोंदी घेणाऱ्या व अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्या सर्व दोषींवर योग्य ती कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व इनामी जमिनीच्या सातबारा व इतर महसुली दप्तरी वरील देवस्थानच्या मालकी हक्कात नोंदी घेण्यात याव्यात, अशी मागणी शाहीद ईन्नूस तांबोळी, मक्सद रज्जाक तांबोळी, शौकत महंमद तांबोळी, सत्तार तांबोळी, पापा तांबोळी, अमजद तांबोळी, लतीफ तांबोळी, अल्ताफ तांबोळी, बाबू तांबोळी, अजितसिंग ठाकूर, बाबुराव गायकवाड, इस्माईल तांबोळी, राहुल गायकवाड, युवराज भाकरे, कृष्णा हाके, नामदेव पतंगे, मेघराज गायकवाड व चांद तांबोळी यांनी राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.

From around the web