उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाची मान्यता द्या
उस्मानाबाद -डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाची मान्यता द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याचा निषेधही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ.गोविंद काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (दि.31) जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला पाठींबा जाहीर केला. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची तसेच सर्व राजकीय पक्षांची प्रामाणिक मागणी आहे. उस्मानाबाद येथे विद्यापीठ होणे ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताची मागणी असून भौगोलिक दृष्ट्या सोयीची आहे. या भागातील अनेक पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची गैरसोय होत असल्यामुळे बहुतांश पालक हे मुलींना पदव्युत्तर शिक्षणासाठी औरंगाबादला पाठवत नाहीत.
उस्मानाबादपासून विद्यापीठाचे अंतर हे सुमारे पावणेतीनशे किलोमीटर असल्यामुळे उच्च शिक्षणापासून बरीब मुले व मुली वंचित राहतात. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा केंद्र सरकारचा मानस असून यापुढे उच्च शिक्षण विशेषतः संशोधनाचे कार्य विद्यापीठामध्येच चांगल्या दर्जाचे होऊ शकते. त्यामुळे उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी 2004 पासूनची आहे. ही मागणी न्यायोचित व योग्य असून आमचा संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा विशेषतः सर्व राजकीय पक्षांचा त्यास पाठींबा आहे.
तरी उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे सादर करावी व लवकरात लवकर उस्मानाबाद येथील उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाची मान्यता द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ.गोविंद काळे, जिल्हाध्यक्ष सतीश खोपडे, सिद्धेश्वर कोळी, जी.टी. चिंचवाड यांची स्वाक्षरी आहे.
गेल्या वीस वर्षापासून पाठपुरावा
उस्मानाबाद जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे येथे विद्यापीठ निर्माण झाल्यास शैक्षणिक संशोधन आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय होईल. सध्या विद्यापीठाचे अंतर तीनशे किलोमीटर असल्यामुळे पालक मुलांना विशेषतः मुलींना एवढ्या दूर पाठवत नाहीत. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वीस वर्षापासून आम्ही स्वतंत्र विद्यापीठासाठी पाठपुरावा करत आहोत. नुकतेच विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीसमोर सर्व राजकीय पक्षांनीही स्वतंत्र विद्यापीठाची एकमुखी मागणी केलेली आहे. या मागणीला आम्ही निवेदनाद्वारे पाठींबा दिला आहे.
प्रा.डॉ.गोविंद काळे
प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना