सोलापूर-तुळजापूर-धाराशिव  रेल्वेमार्ग दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी सुधारीत आराखडा तयार करा

 - आ.राणाजगजितसिंह पाटील
 
e

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव (उस्मानाबाद) रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी ४ वर्षाहून २ वर्षावर आणण्यासाठी सुधारीत आराखडा तयार करण्याच्या सूचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या.

राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी रुपये ४५२.४६ कोटी निधीस नुकतीच मंजुरी दिली आहे. या रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्व्हे करण्यात आला असून त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील ९ व तुळजापूर तालुक्यातील १५ गावातील ४९४.२६ हे. जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठकी दरम्यान शेतकऱ्यांना दिला. 

भू-संपादनानंतर काम पूर्ण करण्यासाठीचा नियोजित कालावधी ४ वर्षाचा असल्याचा उल्लेख उप मुख्य अभियंता श्री.प्रदीप बनसोडे यांनी केला, यावर शिंदे - फडणवीस सरकारने हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर घेण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगत प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी कमी करून तो दोन वर्षांवर आणण्यासाठी सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी या बैठकीमध्ये उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच भू-संपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी, भू-संपादन यांना देण्यात आलेल्या आहेत.

धाराशिव जिल्हा निती आयोगाचा आकांक्षीत जिल्हा असल्याने या महत्त्वाच्या विकास कामासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध होईल असा विश्वास आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

सदरील बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, उपजिल्हाधिकारी  श्री.राजकुमार माने, उप विभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता श्री.प्रदीप बनसोडे, सहा कार्यकारी अभियंता राजनारायण, .नुरुस सलाम,  उप अधिक्षक भूमी अभिलेख .माने, भाजपा जिल्हाध्यक्ष.नितीन काळे यांच्यासह शेतकरी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

From around the web