हलक्या पावसानेच कलेक्टर कचेरीसमोर साचले तळे !
उस्मानाबाद - शनिवारी दुपारी झालेल्या हलक्या पावसाने जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐन प्रवेशद्वारातच तळे साचले. आज उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन मंत्र्यांना होण्यापूर्वी नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी प्रवेशद्वारातच रस्त्यावर साचलेले पाणी हटवून तत्परता दाखविली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आणि परिसरात डांबरीकरण करण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दक्षता न घेतल्यामुळे हे काम व्यवस्थित झालेले दिसून येत नाही. हलक्या पावसानंतर चक्क प्रवेशद्वारातच तळे साचून कार्यालयात येणार्या-जाणार्या कर्मचारी आणि अभ्यागतांची तारांबळ उडते. यावर्षीही पावसाळा सुरु होण्यापूर्वीच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज दुपारी हलका पाऊस झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात तळे साचले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड हे उस्मानाबाद दौर्यावर आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत असताना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अशी स्थिती होती. दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांच्या सूचनेनुसार आरोग्य व स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे यांनी कर्मचार्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर साचलेल्या पाण्याला वाट करुन हटविले. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून नगर परिषदेच्या तत्परतेमुळे केंद्रीय मंत्र्यांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाची अब्रु मात्र वाचली आहे.