उस्मानाबादचे पत्रकार भवन वादाच्या भोवऱ्यात 

आकाशवाणीसमोरील जागा शासन जमा तर पत्रकार भवन होणार भुईसपाट 
 
sd

उस्मानाबाद -  शासकीय नोंदणी नसलेल्या उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पत्रकार भवनही आता वादाच्या भोवऱ्यात  अडकले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संघाची जी इमारत उभी ठाकली आहे ती जागाच एका शिक्षण संस्थेच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. गेल्या ३५ वर्षापासून सुरु असलेला हा वाद अंतिम टप्यात असून, पत्रकार संघाची इमारत भुईसपाट होण्याची शक्यता आहे. 

भारत गजेंद्रगडकर अध्यक्ष असताना सन १९८८ - ८९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ( स्टेडियम जवळ ) एक गुंठा जागा नगर परिषदेकडून मिळाली होती. त्या  जागेवर गजेंद्रगडकर अध्यक्ष असतानाच इमारत बांधण्यात आली आहे. पण मुळात पत्रकार भवन आणि आसपासची ३३ गुंठे जागा बेंबळीचे दिवंगत माजी आमदार आर.के. माने यांच्या नवजीवन शिक्षण संस्थेच्या मालकीची आहे, नगर परिषदेने फेरफार करून ही जागा पत्रकार संघ , काही खासगी व्यक्तीना दिली होती तसेच  काही दुकाने बांधून भाड्याने दिली आहेत. त्याविरुद्ध नवजीवन शिक्षण संस्थेने मंत्रालयात अपील केले होते. 

या अपिलाचा अंतिम निकाल नवजीवन शिक्षण संस्थेच्या बाजूने लागला असून, जागेचे पीआर कार्ड देखील संस्थेच्या नावावर झाले आहे. दिवंगत माजी आमदार आर.के. माने यांच्या मुलांनी सर्व जागा ताब्यात द्यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर नगर परिषदेला पत्र देखील देण्यात आले आहे. पण माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी हे पत्र दाबून ठेवले होते. आता नगर परिषदेवर प्रशासक येताच पुन्हा हालचाली वाढल्या आहेत. 

d


उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची न्यास नोंदणी नाही. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी हा संघ संलग्न होता, पण परिषदेवर देखील गेली अनेक वर्षे प्रशासक आहे, तसेच उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने परिषदेचे कोणतेही नियम न पाळता नेहमीच कोलदांडा मारला आहे. दरम्यान सत्यशोधक तथा आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीवरून आकाशवाणी जवळील सहा गुंठे जागा शासन जमा झाली आहे. तसेच सांजा रोडवरील २० गुंठे जागेचा वादही जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात असून, त्याची सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे आहे तर  पत्रकार भवनही  वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. 

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघावर दोन पदाधिकाऱ्यांनी मनमानी करून पत्रकार संघाची जागा खासगी मालमत्ता केल्याने संघाची माती झाली आहे. जे संघात आहेत त्या इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याबरोबर सल्ला मसलत नाही, मासिक बैठक नाही, वार्षिक सर्वसाधारण सभा नाही, हिशोब नाही , सर्व कारभार अंदाधुंद सुरु असल्याने संघाला एकप्रकारचे खग्रास ग्रहण लागले आहे.

From around the web