उस्मानाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा वीज वितरण कंपनीला दणका !

सोयाबीन नुकसानीपोटी 25 हजार रुपये व्याजासह शेतकर्‍याला देण्याचे आदेश
 
d

उस्मानाबाद -  वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे महावितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दखल न घेतल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतलेल्या शेतकर्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे. सोयाबीन नुकसानीपोटी 25 हजार रुपये तक्रारीच्या दिवसापासून दरसाल दरशेकडा 8 टक्के दराने महावितरण कंपनीने शेतकर्‍याला द्यावेत. तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी 5 हजार आणि तक्रार खर्चासाठी 5 हजार रुपये द्यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष किशोर वडणे, सदस्य अ‍ॅड.मुकुंद सस्ते, अ‍ॅड.शशांक क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.

तक्रारकर्त्याचे वकील अ‍ॅड.सचिन चंद्रकांत गुरव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील शेतकरी परमेश्वर बळीराम पाटील यांची कलदेव निंबाळा शिवारात शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी महावितरण कंपनीमार्फत रीतसर वीज जोडणी घेतलेली आहे. 2021 च्या हंगामात पाटील यांनी शेतात 84 आर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. यापूर्वीच्या हंगामात त्यांना या क्षेत्रामधून 25 क्विंटल उत्पादन मिळालेले आहे.

दरम्यान, पाटील यांच्या शेतात वीज जोडणी देताना दोन खांबामधील अंतर जास्त सोडल्यामुळे वीजतारांना झोळ पडून एकमेकांला चिकटून घर्षण होऊन तारा तुटत आहेत. दि. 7 जून 2021 रोजी दुपारी अशाच कारणामुळे वीजेची तार तुटून पाटील यांच्या शेतातील वीज खंडीत झाली. तुटलेल्या तारांची जोडणी करुन वीज पुरवठा सुरळीत न केल्यामुळे पाटील यांनी 8 जून 2021 रोजी महावितरण कंपनीकडे तक्रार देऊन वीज जोडणी पूर्ववत करण्याची विनंती केली होती. परंतु महावितरणच्या व्यवस्थापनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे पुन्हा 11 जून आणि 17 जून 2021 रोजी तक्रार अर्ज दिला. तरी देखील महावितरणच्या व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे शेतकरी पाटील यांना सोयाबीन पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे शेतकरी पाटील यांच्या सोयाबीन पिकाचे 2,50,000/- रुपयाचे नुकसान झाले. म्हणून पाटील यांनी 8 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली होती. या प्रकरणात महावितरण कंपनीच्या बलसूर उपविभागाचे सहायक अभियंता, उमरगा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता, तुळजापूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर दाखल करण्यात आलेला पुरावा आणि तक्रारकर्ते परमेश्वर पाटील यांच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन सोयाबीन नुकसानीपोटी 25 हजार रुपये तक्रारीच्या दिवसापासून दरसाल दरशेकडा 8 टक्के दराने महावितरण कंपनीने शेतकर्‍याला द्यावेत. तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी 5 हजार आणि तक्रार खर्चासाठी 5 हजार रुपये द्यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. या प्रकरणात तक्रारकर्त्याच्या वतीने अ‍ॅड.सचिन गुरव, अ‍ॅड.महेश निकम यांनी बाजू मांडली.

From around the web