उस्मानाबाद – बेंबळी रस्त्याच्या  दुरुस्तीचे काम तातडीने करा 

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचना
 
s

उस्मानाबाद – बेंबळी रस्त्याचे संथ गतीने सुरु असलेले काम वेगाने करावे, मुदत बाह्य झालेले उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश रद्द करुन घेणे, १९७० च्या निवाडया प्रमाणे रुंदीच्या रस्त्याचे काम सुरु करावे तसेच संपुर्ण रस्ता वाहतुकीसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीचे काम करून घेण्याच्या सुचना आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी सा.बा.विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांना आज झालेल्या बैठकीमध्ये दिले.

उस्मानाबाद - बेंबळी रस्त्याच्या सुधारणेचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले असल्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आज उपविभागीय अधिकारी  योगेश खरमाटे, अधिक्षक अभियंता सा. बा. विभाग  बडे, कार्यकारी अभियंता  एस. चव्हाण, सहायक संचालक, नगर रचना कार्यालय . कुलकर्णी यांच्यासह कंत्राटदार व या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या परिसरातील गावांच्या प्रमुख कार्यकर्त्याची सर्किट हाऊस उस्मानाबाद येथे बैठक घेतली.

या रस्त्याच्या एकूण २८ कि.मी. लांबीचे काम मागील अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. रस्त्या मध्ये जात असलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी विविध शेतकऱ्यांनी  उच्च न्यायालयात ३ याचिका दाखल केल्या होत्या. यातील एका याचिकेचा निकाल लागला असुन त्या अनुषंगाने ९ कि.मी.चे काम सुरु आहे. दुसऱ्या याचिकेत सन २०२० मध्ये स्थगिती देण्यात आली आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ६ महिन्यानंतर सदरील आदेश रद्द करून घेता येतो, तर तिसऱ्या याचिकेत . उच्च न्यायालयाचे अद्याप आदेश आलेले नाहीत.

ज्या ९ कि.मी. लांबीच्या रस्त्याबाबत काही तंटा नाही त्यांचे संथगतीने सुरू असलेले काम वेगाने पुर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या असून उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी सुलभ करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या बाबत उद्या संबंधित कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व गावातील प्रमुख संयुक्त रित्या रस्त्याची पाहणी करणार असून त्यानंतर कधी पर्यंत काय करणार याबाबत लेखी अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना दिल्या आहेत.

सन १९७० च्या निवाडया प्रमाणे हद्दी कायम करून संबंधित रस्त्यावर पोलीस संरक्षण घेऊन काम सुरू ठेवण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी  योगेश खरमाटे यांनी कार्यकारी अभियंता श्री एस.के. चव्हाण यांना दिल्या.

अधीक्षक अभियंता  बडे यांना देखील रस्त्याची पाहणी करून वाहतुकीसाठी प्रवाशांना त्रास होणार नाही यासाठी कंत्राटदाराकडून तात्पुरते काम करून घेण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच ज्या गावातील लोकांनी याचिका दाखल केल्या आहेत, त्यांना समजावून सांगून 'मावेजा साठी लढा! मात्र काम न आडविण्याबाबत' विनंती करण्याचे ठरले असून परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधींनी ही जबाबदारी घ्यावी, असे सूचित केले.

यावेळी  राजाराम कोळगे, . बालाजी गावडे, आशिष नायकल, व्यंकट पाटील, संजय दळवे, मेहबूब शेख, नाना कदम, नर्सिंग खुणे, कुमोद सुतार, राजाभाऊ गव्हाणे, रमण आगळे, काका शेलार, महेश लांडगे यांच्यासह उस्मानाबाद - बेंबळी रस्त्यावरील गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
 

From around the web