नळदुर्ग शहराला नगरोत्थान योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना मिळणार

 
news

नळदुर्ग - नळदुर्ग शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून जलकुंभ कोसळण्याच्या स्थितीत आहे. असे असतानाही नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष करत नवीन पाणी पुरवठा योजना आजवर प्रस्तावितच केली नाही. नगर परिषदेतील सत्ताधारी राज्यात देखील सत्तेत आहेत, मात्र मागील दोन वर्षात त्यांना हे जमले नाही. 

दि. २२/०२/२०२२ रोजी नळदुर्ग येथे आयोजित जनता दरबार मध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भात  तक्रारी आल्या होत्या. नळदुर्ग शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे ५० वर्षापूर्वी जलकुंभ उभारण्यात आले होते. त्यापैकी एक मनोरा पध्दतीने बांधण्यात आलेला जलकुंभ जीर्ण झाला असून त्याची कालमर्यादा संपुष्टात आल्याने तो कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नळदुर्ग शहराची वाढती लोकसंख्या पाहता सद्यस्थिती असलेल्या जलकुंभाची क्षमता कमी असल्याने शहरास आवश्यक असलेला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना राबविणे आवश्यक आहे.

मुख्याधिकारी नगर परिषद नळदुर्ग यांना या योजनेअंतर्गत शहराच्या पुढील ३० वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तूर्तास ६.२० लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून तांत्रिक मान्यता देखील घेण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज या अनुषंगाने नवीन अधिक क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासाठी लागणारा निधी तसेच प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला नगरविकास मंत्री. ना. एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत नळदुर्ग शहर नवीन पाणीपुरवठा प्रकल्प प्रस्तावित करण्याचे नगर परिषदेचे नियोजन असून सदर प्रकल्पास तांत्रिक मान्यतेअंती नगर परिषद प्रशासन संचालनालय मार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत विचारात घेण्यात येईल असे नमूद केले आहे.

नगर परिषद प्रशासन संचालनालयातील अधिकाऱ्यांशी देखील याबाबत चर्चा केली असून प्रस्ताव आल्याबरोबर तातडीने निधीसाठी शासनाकडे पाठविण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

भविष्यातील ३० वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून या योजनेची आखणी करण्यात येणार असल्यामुळे नळदुर्ग करांचा अनेक वर्षापासुनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. 

From around the web