उस्मानाबाद जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा
उस्मानाबाद - कुटुंब नियोजन हे केंद्रशासनाचे अत्यंत महत्वाचे धोरण आहे. मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली असूनसुद्धा अद्यापही कुटुंब नियोजनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रियांनाच पार पाडावी लागते. केंद्र शासनामार्फत कुटुंब नियोजनात पुरुषाच्या सहभागाला चालना देण्यासाठी तसेच पुरुष नसबंदी पद्धती जसे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, निरोधचा वापर यांचे प्रमाणे वाढविण्याच्या हेतूने पुरुष नसबंदी पंधरवाडा दरवर्षी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात साजरा करण्यात येतो.
कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील आणि बळकट करण्यासाठी यावर्षी सुद्धा केंद्रशासनाच्या या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा 2022 राबविण्यात येत आहे. हा पंधरवाडा 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा केल्याने पुरुष शस्त्रक्रिये बाबत समाजात जनजागृती होऊन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढविण्यास निश्चित मदत होईल. ही पद्धत कायमस्वरूपी पुरुष कुटुंब नियोजनाची पद्धत नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा सोपी असते. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. शस्त्रक्रियेत कुठलीही जखम केली जात नाही. टाके दिले जात नाहीत. शस्त्रक्रियेमुळे पुरुषार्थ कमी होत नाही. पुरुष पूर्वी प्रमाणेच सर्व कामे करू शकतो. शस्त्रक्रिये नंतर रोख शासकीय अनुदान दिले जाते. वैवाहिक जीवन आनंदाने घालविता येते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त् पुरुषांनी नसबंदी पंधरवाड्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.