उस्मानाबाद तहसील कार्यालयात नक्कलेसाठी नागरिकांची लूट 

अभिलेखापाल श्रीमती शामल वाघमारे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद तहसील कार्यालयात नकलेच्या प्रतीसाठी लूट केली जात होती. एका पान - पेज साठी चक्क ३० रुपये आकारले जात होते. तसेच ही रक्कम बँकेत जमा न करता अधिकाऱ्यांच्या घशात जात असल्याचा आरोप सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केला होता. याप्रकरणी अभिलेखापाल श्रीमती शामल वाघमारे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी  डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. 

उस्मानाबाद  तहसील कार्यालयात कागदपत्रांच्या नक्कल प्रतीसाठी दररोज शंभराहून अधिक अर्ज येतात. एक तर नक्कल प्रत  वेळेवर दिली जात नाही तसेच अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे, विशेष म्हणजे पावती मागितली असता दिली जात नाही. तहसील कार्यालयात दररोज नकलेच्या प्रतीसाठी किती अर्ज आले, याचे रेकॉर्ड ठेवले जात नाही, किती रक्कम आली याचीही  स्वतंत्र नोंद वही (कॕश बुक) ठेवले जात नाही, तसेच नकलेसाठी जमा झालेली रक्कम दररोजच्या दररोज चलनद्वारे बँकेत भरली जात नाही. 

d


उस्मानाबाद तहसील कार्यालयात नकलेसाठी नागरिकांची कशी लूट केली जाते याचे स्टिंग ऑपरेशन सुभेदार यांनी केले होते आणि उस्मानाबाद लाइव्हने ते प्रसारित केले होते. त्यानंतर सुभेदार यांनी याप्रकरणी  जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार  केली असता, या अर्जावरून उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे खुलासा मागितला असता, त्यांनी गोलमाल खुलासा करून भिलेखापाल श्रीमती शामल वाघमारे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. पण सुभेदार यांनी हे प्रकरण उचलून धरले असता, आता  अभिलेखापाल श्रीमती शामल वाघमारे यांची विभागीय चौकशी होणार आहे.


सदर प्रकरणी संबंधितांनी महाराष्ट्र कोषागार नियम 1964 आणि नियम 104 नुसार सरकारच्या वतीने पैसे स्वीकारताना नमुन्यातील पावती देणे बंधनकारक आहे त्यानुसार कार्यवाही झालेले दिसून येत नाही असा शेरा मारून जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
 

From around the web