सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गोवर्धनवाडी येथील एकाच संस्थेला १ कोटीच्या १४ कामे वाटपाचे पत्र ! 

चौकशी करुन संबंधितावर गुन्हे दाखल करा - भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे
 
d

उस्मानाबाद - सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली उस्मानाबाद पाटबंधारे विभागाकडून गोवर्धनवाडी येथील एकाच संस्थेला नियमबाह्य पद्धतीने १ कोटीच्या १४ कामांचे वाटप करण्याचे पत्र देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. विकासकामांच्या नावाखाली गुत्तेदारी आणि टक्केवारीमधून सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वत:चा आणि स्वकीयांचा आर्थिक विकास करण्यात दंग आहेत. याबाबत आज  भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली (दि.6) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


मागील काही दिवसापासून जिल्हयामध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधी नियमबाहय पध्दतीने स्वतःसाठी व स्वत:च्या हितसंबंधीतांना शासकीय कंत्राटे व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकिय अधिकारी यांच्यावर दबाव तंत्राचा अवलंब करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी स्थानिक लोक प्रतिनिधीच्या दबावाखाली कार्यकारी अभियंता उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र.1 यांनी  कळंब व उस्मानाबाद तालुक्यातील 104 लक्ष रुपयाची 14 कामे तेरणाकाठच्या गोवर्धनवाडी येथील एकाच मजूर संस्थेस देण्याबाबत शिफारस केली आहे. ही कामे वाटप करत असताना शासन निर्णयाचे पालन केले गेले नाही. एवढ्या मोठ्या रक्कमेची कामे  फक्त एकाच संस्थेला देण्यात अधिकाऱ्याचे प्रयोजन काय? तसेच ऑनलाईन कामांची यादी काम वाटप समितीकडे पाठविणे नियमानुसार बंधनकारक असताना संबंधीत कार्यकारी अभियंता यांनी काम वाटपाचे पत्र ऑनलाईन न पाठवता लोकप्रतिनीधीने सांगितलेल्या व्यक्तीच्या हातात का दिले?  त्यामुळे 1 कोटी पेक्षा जास्त रक्कमेची कामे एकाच संस्थेला देत असतांना प्रशासकिय पातळीवर जिल्ह्यातील इतर पात्र मजुर संस्थावर अन्याय करण्याचे धोरण राबविण्याऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.   


तसेच ज्या उद्देशाने मजुर संस्था निर्माण झाल्या त्या सर्वसामान्य कष्टकरी व ज्याचे हातावर पोट आहे, त्या संस्था व मजुरांना काम मिळावे, रोजगार उपलब्ध व्हावा या हेतुलाही एकाच संस्थेला काम वाटप केल्याने हरताळ फसतो याचाही संबंधीत अधिकाऱ्यांनी विचार केला नाही.


मागील काही दिवसात शासनाच्या विविध खात्यामध्ये असे प्रकार घडले आहेत, त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती, परंतु आज प्रत्यक्षात हाती आलेल्या कागदपत्रावरुन हे प्रकरण मोठे असुन मागील दोन वर्षात झालेल्या अशा सर्व यंत्रणाकडील प्रकरणाचीही उच्च स्तरीय समिती गठीत करून सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच वेगवेगळया यंत्रणेकडे उपलब्ध असलेली कामे ही योग्य वर्गातील सक्षम मजुर संस्थांना देण्यात देण्याबाबत काम वाटप समिती सदस्य व जिल्हा उपनिबंधक यांना आदेशित करण्याची मागणी केली.


सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व हित संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करावी, अन्यथा भाजपा सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तिव्र आंदोलन करेल तसेच लोकशाही व सनदशीर मार्गाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल, असेही भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.


प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी यांनी त्वरीत काम वाटपास स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले. 


निवेदनावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, सरचिटणीस नितीन भोसले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,शहराध्यक्ष राहुल काकडे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, एस. सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसाठे,सुजित साळुंके,शेषेराव उंबरे, रोहित दंडनाईक,अमोल पेठे, सागर दंडनाईक,मेसा जानराव,स्वप्नील नाईकवाडी,यांची स्वाक्षरी आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन - जिल्हाध्यक्ष नितीन काळे

जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी अधिकार्यांरना अर्वाच्च भाषेत बोलणे, संबंधित अधिकार्याधला काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दडपण आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याची आजपर्यंत चर्चा होती. परंतु तीन ते चार दिवसांपूर्वी अजब किस्सा घडला आहे. पाटबंधारे खात्याचे एस. एस. आवटे नावाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर सत्ताधारी लोकप्रतिनिधीने दडपण आणून कामात समितीच्या माध्यमातून एक कोटी पेक्षाही जास्त कामे वाटप समितीकडे पाठवण्यात आली. काम वाटप समितीच्या माध्यमातून सर्व 14 कामे गोवर्धनवाडी येथील संस्थेला देण्यास सांगीत्लयाचे ही उघडकीस आले आहे. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या खासदार, आमदारांनी केलेल्या या कारनाम्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करुन जिल्हाधिकार्यां ना निवेदन दिले आहे. या कामाची आणि संबंधित अधिकार्या ची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिला आहे.


कुंपणच शेत खातंय - दत्ताभाऊ कुलकर्णी

सध्या कुंपणच शेत खातंय अशी अवस्था या जिल्ह्याची झाली आहे. जिल्ह्यातील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे, परंतु हे सत्ताधारी अधिकाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने काम करायला प्रवृत्त करत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यानिशी निवेदन दिलेले आहे. आर्थिक विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी अशा पद्धतीची कामे अधिकाऱ्यांना सांगू नये. 

ज्यांना जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे, त्यांच्याकडून अशा भ्रष्ट पद्धतीच्या कामाची अपेक्षा नाही, असे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

From around the web