अखेर ठरलं : उस्मानाबादचं नामकरण होणार 'धाराशिव' !
उस्मानाबाद - अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला उस्मानाबाद शहराचे पूर्ववत 'धाराशिव ' असे नामकरण करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी धडकताच शहरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व शिवसेनेचा जयघोष करण्यात आला.हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
निजामाच्या हैदराबाद संस्थानात असलेल्या मराठवाड्यातील धाराशिवचे शहराचे शेवटचा निजाम मीर उस्मानअली याच्या नावावरुन उस्मानाबाद असे ठेवण्यात आले होते. शंभर वर्षापासून या शहराचा उस्मानाबाद असा उल्लेख होत असला तरी ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक अजूनही 'धाराशिव' असाच नामोल्लेख या शहराचा करतात. निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी एक वर्ष एक महिना संघर्ष केल्यानंतर हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र भारतात विलीन झाले. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे उस्मानाबाद (धाराशिव ) शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसैनिकांसह हिंदुत्ववादी संघटनांनी फटाक्यांची आतषबाजी करुन मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, तालूका प्रमुख सतीष सोमाणी,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शहरप्रमुख संजय मुंडे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, सोमनाथ गुरव, नितीन शेरखाने, सौदागर जगताप, मुकेश पाटील, धनंजय इंगळे, नेताजी गायकवाड, विष्णु ढवळे, गणेश सगर, किरण बोचरे, हनुमंत देवकते, भीमा जाधव, पांडु भोसले, बंडू आदरकर,कृष्णा साळुंके, निलेश शिंदे, अभिजित देशमुख, राहुल पवार, बंडू आदरकर, विजय ढोणे, दिपक जाधव,पंकज पाटील, सुरेश गवळी, प्रभाकर राजे, राणा बनसोडे, लक्ष्मण जाधव, नंदकुमार माने, मणजीत लोमटे,सतीश लोंढे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात पहिल्यांदा 1995 साली शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुस्लीम समाजातील काहीजणांनी याविरोधात उच्च न्यायालयात यचिका दाखल केली होती. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. त्यानंतर 1999 नंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही याचिका निकाली काढून धाराशिव नामकरणावर पडदा टाकला होता. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन हा निर्णय घेतलेला असल्यामुळे या निर्णयाला मोठे महत्व प्राप्त झाले असल्याचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके यांनी सांगितले.
न्यायालयात आव्हान देणार
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याच्या मंत्रिमंड्ळाच्या या निणर्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणार असल्याचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष खलील सय्यद आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मसूद शेख यांनी सांगितले.