खा छत्रपती संभाजीराजे यांचा श्री तुळजाभवानी मंदिरात अवमान
तुळजापूर : खा छत्रपती संभाजीराजे यांचा श्री तुळजाभवानी मंदिरात जो अवमान झाला त्याबद्दल मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त करूनही हे प्रकरण आता चांगलेच तापताना दिसत आहे. सकल मराठा समाजातर्फे उद्या ( गुरुवारी ) तुळजापूर बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर आणि संभाजीराजेंच्या घराण्याचे विशेष नाते राहिले आहे. मात्र, पुरातत्व विभागाच्या एका निर्णयामुळे छत्रपती संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.या घटनेनंतर मंदिर तहसीलदार, व्यवस्थापक यांच्यावर आता कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण ?
खा. छत्रपती संभाजीराजे हे दि. ९ मे रोजी रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आले असता, कलम ३६ च्या अनुपालन करत पुजाऱ्यांनी गाभाऱ्यात जाऊ दिले नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्याना फोन लावून खडे बोल सुनावले होते. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दि. १० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंदिर व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
या अवमान प्रकरणी बातम्या प्रकाशित होताच, समाज माध्यमात मंदिर संस्थान विरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला , त्यानंतर मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. तरीही या प्रकरणी मंदिर व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी गुरूवारी तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
अगदी लहानपणापासून छत्रपती संभाजीराजे नियमितपणे आई तुळजा भवानीच्या दर्शनाला येत असतात...शिवरायांचे वारसदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे, असे अनेकांचे मत आहे.