उस्मानाबाद शहर व जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेले सर्व स्वीमिंग पूल तात्काळ बंद करा 

- पालकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
 
d

उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहर व जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेले सर्व स्वीमिंग पूल तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहरातील पालकांच्या वतीने आज (दि.17) जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. दोन मुलांचा बळी गेल्यानंतरही असे प्रकार सुरुच असल्यामुळे प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वीमिंग पूल सुरू करण्यात आलेले आहेत.  सध्या शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या असल्यामुळे लहान मुले, तरुण या स्वीमिंग पूलमध्ये मोठी फीस भरुन पोहायला शिकण्यासाठी तसेच अनेकजण पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जात आहेत. परंतु आमच्या निदर्शनाला असे आले आहे की, या सगळ्या स्वीमिंग पूलच्या देखभालीसाठी कुठेही प्रशिक्षित ट्रेनर उपलब्ध नाही. एखाद्या ठिकाणी ट्रेनर असला तरी तो मुले पोहत असताना जागेवर हजर नसतो.

 स्वीमिंग पूल चालवणार्‍यांच्या निष्काळजी कारभारामुळे गेल्या आठवडाभरात दोन मुलांना जीव गमवावा लागला आहे. उस्मानाबाद शहरामधील समता नगर येथील एका स्वीमिंग पूलमध्ये पोहत असताना तारेख मुनिफ शेख (वय 14)  या मुलाचा रविवार, दि. 15 मे रोजी मृत्यू झाला. या घटनेच्या आधी उस्मानाबाद शहरामधीलच हॉटेल राजासाब येथील स्वीमिंग पूलमध्ये जियान मुल्ला या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना 7 मे रोजी घडलेली आहे.

एकाच आठवड्यामध्ये दोन मुलांचा बळी फक्त आणि फक्त उन्हाळ्यामध्ये मुलांना पोहायला शिकण्याचे आमिष दाखवून पैसे लुटणार्‍या स्वीमिंग पूल चालकांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये प्रचंड भीती पसरली आहे. या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करुन दोषीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अजून मुलांचे बळी जाण्यापूर्वी शहरात आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे चालू असलेले सर्व स्वीमिंग पूल तात्काळ बंद करण्यात यावेत. अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. 

आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास आणि परत बेकायदेशीर स्वीमिंग पूल सुरू असल्याचे दिसून आले तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करु असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर मसूद शेख, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर,  पृथ्वीराज चिलवंत, गणेश खोचरे, मोईनोद्दीन पठाण, कादरखान पठाण, बाबा मुजावर, नाना घाटगे, अन्वर शेख, मन्सूर काझी, इस्माईल काझी, सिद्धीक काझी, समीयोद्दीन मशायक, सय्यद मुस्तकीमोद्दीन कादरी, एजाज कैसर काझी, बंडू आदरकर, बिलाल तांबोळी, अफजल सय्यद आदी नागरिकांची स्वाक्षरी आहे.

d


प्रशासनाचे दुर्लक्ष - मसूद शेख
उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जलतरण तलावाच्या चालकांनी कोणतीही काळजी न घेतल्यामुळे दोन मुलांचा जीव गेला आहे. परंतु प्रशासनाकडे अशा जलतरण तलावांची कोणतीही नोंद किंवा माहिती नाही. त्यामुळे उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे चालणारे जलतरण तलाव बंद करण्यात यावेत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु.


तुळजाभवानी स्टेडियममधील जलतरण तलाव सुरू करा  - दत्ता बंडगर
तुळजाभवानी जिल्हा स्टेडियममध्ये कोट्यवधी रुपये खर्चून जलतरण तलाव सुरु करण्यात आला आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किरकोळ दुरुस्तीअभावी तो बंद आहे. तो जलतरण तलाव सुरु केल्यास इतर ठिकाणी चालणारे बेकायदेशीर जलतरण तलाव बंद होतील व मुलांच्या सुरक्षेचीही इथे काळजी घेतली जाईल, अशा पद्धतीने प्रशसानाने नियोजन करणे गरजेचे आहे.


 

From around the web