शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी तातडीने बैठक घ्या... 

- आ. राणाजगजितसिंह पाटील यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी
 
medical

उस्मानाबाद -  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समितीची मान्यता मिळवून देण्यासाठी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अभ्यासक्रम सुरु व्हावा यासाठी तातडीने आढावा बैठक घेण्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री  अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

दि.०७/०३/२०२२ रोजी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधान भवन, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख, पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, पालकमंत्री ना. शंकराव गडाख यांच्यासह जिल्ह्यातील आमदार यांच्या प्रमुख उपस्थित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत बैठक झाली होती. सदर बैठकीत पद भरती, जागा निश्चिती व हस्तांतरण तसेच प्रयोगशाळा उभारणे याबाबत सविस्तर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले होते. या नुसार बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने एक आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते. यामुळे या कामांना अधिकची गती मिळेल व उस्मानाबादकरांचे अनेक वर्षांपासूनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आगामी शैक्षणिक वर्षांत पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु दि.०७/०३/२०२२ रोजी झालेय बैठकीचे इतिवृत्त अध्याप उपलब्ध झाले नसल्याची बाब नमूद करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारतीताई पवार यांनी दि.१८.०४.२०२२ रोजी उस्मानाबाद येथे आरोग्य विषयक तसेच आकांक्षित जिल्हा आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात जिल्हा रुग्णालयासोबत वैद्यकीय महाविद्यालय हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला. चर्चे दरम्यान लक्षात आलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह जागा हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सामंजस्य करार होणे अपेक्षित असताना सदर प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याचे तसेच अधिष्ठाता हे एक पद वगळता वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारे आवश्यक प्राध्यापक, सपोर्टींग स्टाफ यांची भरती झालेली नसल्याचे आ. पाटील यांनी पत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले होते. 

सातत्याच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची काल सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली असून आता हा विषय मुख्यतः वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुपूर्द झाला आहे. सदरील विषय मार्गी लावण्याच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून तात्काळ यावर कार्यवाही करणे अपेक्षित असून यासाठी ना. अमितजी देशमुख यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे असे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले. 

तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समिती (NMC) ने उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेस दि.०४.०२.२०२२ रोजी भेट देऊन पाहणी केली असून यात सदर समितीने काही त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय NMC ची पुढील पाहणी होणे उपयोगाचे ठरणार नसल्याचे सांगत सर्व बाबींचा विचार करता उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समितीची मान्यता मिळवून देण्यासाठी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अभ्यासक्रम सुरु व्हावा यासाठी तातडीने आढावा बैठक घेण्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री  अमित देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे.

From around the web