उस्मानाबाद जिल्हा समृध्द आणि निरोगी असावा  हा शासनाचा मानस - पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

परंडा येथील महाआरोग्य शिबिराचे उदघाटन
 
s

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी हे सर्वं रोगाचे निदान एकाच ठिकाणी व्हावे म्हणून या महाआरोग्य शिबिरात देश विदेशातील मोठे डॉक्टर्स उपस्थित आहेत.  प्राथमिक स्वरुपांच्या चाचण्या या ठिकाणी होत आहेत. त्यानंतर प्राथमिक उपचार आणि औषध याच ठिकाणी दिली जात आहेत. जर काही गंभीर आजार असतील त्यांच्या सर्व चाचण्या व सर्व परीक्षणे तसेच सर्व शस्त्रक्रिया शासनाच्या वतीने पुढच्या महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज परंडा येथे कोटला मैदानावर आयोजित महाआरोग्य मेळाव्याच्या प्रसंगी केले.

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राज पाटील-गलांडे, जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हालकुडे, सोलापूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे आणि डीन डॉ.संजय ठाकूर, उस्मानाबादचे डीन डॉ.दोमकुंडवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशिल चव्हाण, डॉ.धर्मेंद्रकुमार, डॉ.मनोज अग्नेय, परंडा-भूमच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, डॉ.गोविंद रेड्डी, डॉ.दिलीप पवार, लातूर आरोग्य उपसंचालक शिवानंद टाकसाळे, डॉ.कोमल चामले, डॉ.कैलास बावीस्कर, धनंजय सावंत आदी उपस्थित होते.

           हा महाआरोग्य मेळावा एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. महाराष्ट्रात प्रथमत: अशा प्रकारचा आरोग्य मेळावा घेण्यात येत आहे. यासाठी अनेक दिवसांपासून युध्द पातळीवर तयारी करण्यात आली होती आणि आज सर्व वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि नगर परिषद व आशा वर्कर्सच्या मेहनतीचे फळ आपल्या समोर आहे. अशाच प्रकारचे आरोग्य मेळावे घेण्याचे शासनाचे मानस असून माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अनुषंगाने प्रत्यक्षात राज्यभरात आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

             यावेळी डॉ.सावंत म्हणाले की, या आरोग्य शिबीरासाठी जिल्ह्यातील माता भगिनींना आणि बंधूंचा सर्व्हे जवळपास एक महिन्यापासून चालू होता . प्रत्येक घरोघर आरोग्य दूत आणि आशा वर्कर्स यांनी माहिती घेतली यात त्यांचे मोठे योगदान आहे.

           या आरोग्य शिबीरासाठी समन्वयक म्हणून डॉ. धर्मेंद्रकुमार तसेच भैरवनाथ शुगर लिमिटेडचे सर्वेसर्वा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्याने आजचा हा आरोग्य मेळावा कार्यक्रम होत आहे. डॉ.सावंत पुढे म्हणाले की, आपण एक संकल्पना महाराष्ट्रभर राबवली आहे. “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” आणि या अभियानामुळे आज महाराष्ट्रभर जवळपास चार कोटी माता भगिनींच्या तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत.

d

             यावेळी डॉ.सावंत यांच्या हस्ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड व ABHA कार्डचे वाटप करण्यात आले.आजच्या या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य चाचणी होणार आहे तसेच देश विदेशातील डॉक्टर्स आपल्या सेवेस आज उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमातून आज सर्वांचे रोग निदान करुन त्यांचा रिपोर्ट तयार करून घेतला जाणार आहे. हा रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ज्या बंधू भगिनींना आणि शेतकरी बांधवांना कुठले आजार आहेत आणि हे आजार कोणत्या टप्यावरती आणि कोणत्या हॉस्पिटलला पुन्हा त्याचा उपचार घ्यायचा ? याचे सुद्धा नियोजन केलेले आहे. या शिबीराच्या ठिकाणी तपासणी झाल्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर दिला जाईल, तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल, तपासण्या झाल्यानंतर पूर्ण त्याचा चार्ट तयार होईल आणि त्या आठ दिवसांमध्ये तुमच्या पुढील ज्या तपासणी, शस्त्रक्रिया असतील, औषध उपचार असतील ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळे मोफत दिले जाणार आहेत, असेही यावेळी डॉ.सावंत म्हणाले.

पालकमंत्र्यांनी केले अवयव दानाचे आवाहन

 या महाआरोग्य मेळाव्यास उपस्थित सर्व नागरिकांनी अवयव दान करावेत. रक्तदान आणि अवयव दान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या या श्रेष्ठ दानामुळे 32 लोकांना आयुष्य मिळू शकते.  

From around the web