क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नावाने यंदापासून शासनाचा शिक्षक पुरस्कार
उस्मानाबाद - राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा शिक्षक पुरस्कार यावर्षीपासून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नावाने दिला जात आहे. देशात बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आपले आयुष्य पणाला लावणार्या क्रांतिज्योती सावित्रमाईंच्या नावाने यावर्षी पहिल्यांदाच शिक्षक पुरस्कार मिळणार असल्याने डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणार्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सदरील पुरस्काराला आजपर्यंत कोणतेही नाव नव्हते. केवळ शिक्षक पुरस्कार असा या पुरस्काराचा उल्लेख केला जात होता. यावर डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षापासून राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्या शिक्षक पुरस्काराला त्यांच्या महान कार्याचा गौरव करावा यासाठी शासन दरबारी लढा दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची परिषदेच्या शिष्टमंडळाने वारंवार भेट घेऊन, निवेदने देऊन राज्य शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव देणेच योग्य राहील हे निदर्शनास आणून देत ही मागणी लावून धरली होती.
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षापासून सुरु केलेल्या लढ्याला यश आले असून महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणार्या शिक्षकांना दरवर्षी दिल्या जाणार्या राज्य शिक्षक पुरस्काराला आता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव दिलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे. यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नावाने हा पुरस्कार शिक्षकांना प्रदान करण्यात येत आहे.
या निर्णयाचे डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संस्थापक पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष (प्रा.) लक्ष्मण नेव्हल, प्रदेशाध्यक्ष (मा.) प्रदीप सोळुंके, महासचिव सतीश काळे, महासचिव सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, राज्य समन्वयक शामराव लवांडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष बळवंत घोगरे, श्रीहरी लोखंडे, भालचंद्र कोकाटे, जीवराज पडवळ, शशिकांत देशमुख, शिवशंकर स्वामी, अविता वाघमारे, के.डी.वाघ, अनंत मिटकरी, सुनिल मनवर, विनोद डाखोरे, रमेश पवार, सादिक पठाण, नरेंद्र हाडके, दत्तात्रय गावंडे, राजु उरकुडे, नितीन ठाकरे, प्रशांत जिन्नेवार, देवदत्त भोयर, राजकुमार भोयर, राजेंद्र गुघाणे, अखलाखसर, संदिप ठाकरे, संदिप गोहोकार, विजय कदम, मधुकर डहाके, गीताताई बेले, पुष्पाताई महल्ले, सुवर्णाताई डोंगरे, सुचिता मासूरकर, मीनाताई काळे आदींनी स्वागत केले आहे.