सोलापूर येथे पुढील महिन्यात गुरव समाजाचे महाअधिवेशन
उस्मानाबाद - सोलापूर येथे पुढील महिन्यात ( ११ डिसेंबर ) गुरव समाजाचे महाअधिवेशन होणार असून, या महाअधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यासह सहा मंत्री उपस्थित राहणार आहेत. या महाअधिवेशनास उस्मानाबाद जिल्ह्यातील दहा हजार गुरव समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती अणदूर श्री खंडोबा देवस्थान समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिली.
महाराष्ट्रात गुरव समाजाची संख्या जवळपास पाच लाखापेक्षा जास्त असून, अल्पसंख्याक समाज म्हणून गुरव समाजाची ओळख आहे. राज्यातील विविध मंदिराचे पुजारी गुरव समाजाचे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात अणदूर - नळदुर्गचा श्री खंडोबा, येरमाळ्याची येडेश्वरी देवी तसेच जिल्ह्यातील अनेक मंदिराचे पुजारी हे गुरव समाजाचे आहेत, पण मागील काही काळात गुरव समाजावर अत्याचार वाढले करून, मंदिराचे पुजारीपद काढून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच गुरव समाजाच्या ताब्यात असलेल्या देवस्थान इनामी जमिनी अनेकांनी लाटल्या आहेत. गुरव समाजावरील अत्याचार बंद व्हावा, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच देवस्थान इनामी जमिनी वर्ग - ३ खालसा करून गुरव समाजाच्या नावे कराव्यात ( जेणेकरून पीक कर्ज, विमा तसेच शासनाचे विविध लाभ मिळतील ) ज्या देवस्थान समिती शासनाच्या ताब्यात आहेत, त्या समितीमध्ये पुजारी - गुरव समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, पुजाऱ्यांना मंदिरात पोलीस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात येणार आहेत.
गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष आणि बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतुत्वाखाली सोलापूर येथे पुढील महिन्यात ( ११ डिसेंबर ) होणाऱ्या या महाअधिवेशनाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना बुधवारी देण्यात आले. यावेळी गुरव समाज महासंघाचे सचिव मल्लिकार्जुन गुरव ( सोलापूर ) उपाध्यक्ष यशवंत ढेपे ( बाळे ) आदी उपस्थित होते.