नॅचरल शुगर आणि एन साई मल्टीस्टेट सोसायटीकडून फसवणूक

हार्वेस्टरमालक शेतकर्‍याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
 
sd

उस्मानाबाद  - कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर आणि एन साई मल्टीस्टेट सोसायटीकडून अर्थसाह्य घेऊन ऊसतोडणी यंत्र खरेदी केलेल्या उत्रेश्वर चंद्रकांत जाधवर या शेतकर्‍याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली असून न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी दि.11 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज (दि.12) दुसर्‍या दिवशीही हे उपोषण सुरुच होते.

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात जाधवर यांनी म्हटले आहे की, त्यांनी रांजणी येथील नॅचरल शुगर आणि एन साई मल्टीस्टेट सोसायटीकडून अर्थसाह्य घेऊन 25 टक्के अनामत रक्कम घेऊन ऊसतोडणी यंत्र खरेदी केले. दरम्यान, 2019-20 या गळीत हंगामात दुष्काळी स्थितीमुळे नॅचरल शुगर 1 बंद ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे चेअरमन यांनी दुसरीकडे ऊसतोडणी करण्यास तोडी सांगितलेले होते. संबंधित कारखान्याकडील बिल देखील यांच्या सांगण्यावरुन अडवून ठेवले. त्यानंतर कोरोना लॉकडाऊन काळात आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना कारखाना आणि मल्टीस्टेटकडून वारंवार नोटिसा येत होत्या. 2020-2021 या हंगामात नॅचरल शुगरकडेच ऊसतोडणी यंत्र चालविलेले आहे. या हंगामात ऊसतोडणीचे झालेले बिल तसेच सन 2018 ते 2020 सालापर्यंत ऊस तोडणी यंत्राची रक्कम नियमित भरणा केलेली आहे. तरी देखील कर्जखात्याचा तपशील जशासतसा दाखवून आर्थिक अडचणीत आणले जात आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी यंत्र खरेदी करताना जमा केलेली 45 लाख रुये रक्कम सुद्धा कर्ज खात्यामध्ये दाखवली जात नाही. त्यामुळे या रकमेवरील व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

व्याजाचे हप्ते सातत्याने भरल्यानंतर मल्टीस्टेट सोसायटीकडून पावत्या व खात्याचा तपशील देखील दिला जात नाही. ही बाब चेअरमन यांच्या निर्दनास आणून दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यांच्या जाचास कंटाळून आपण आत्मदहनाचा इशारा दिला होता. तेव्हा कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने सदरील व्यक्ती आत्मदहनाचा अर्ज देऊन आमचे व्यवस्थापनास वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पत्र कारखाना व्यवस्थापनाने देऊन जिल्हा प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचेही जाधवर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात कारखाना व्यवस्थापनाची चौकशी करण्यात यावी, तसेच आपण स्वतः दोषी आढळल्यास माझ्यावरही कार्यवाही करण्यात यावी, अशी प्रांजळ भावना व्यक्त करुन कारखाना आणि मल्टीस्टेटच्या जाचातून मुक्तता करावी, अशी मागणी जाधवर यांनी निवेदनात केली आहे. 
 

From around the web