कागद विरहित न्यायालयीन सेवेचेे प्रथम पाऊल

ई-फायलिंग प्रणालीचा उस्मानाबाद न्यायालयात प्रारंभ
 
s

उस्मानाबाद - सर्वोच्च न्यायालय, ई-कमिटी व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापुढे न्यायालयीन कामकाज कागद विरहित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायमूर्ती अरूण आर. पेडणेकर यांच्या हस्ते रविवार, 8 जानेवारी रोजी ई-फायलिंग प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्यायालयात वकिल व पक्षकारांना ई-फायलिंग प्रणालीबाबत सेवा देण्यासाठी न्यायालयात ई-सेवा केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा अंजू एस. शेंडे होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश आर. एस. गुप्ता, महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. एम. एस. पाटील, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. आर. मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी न्यायालयात नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ई-सेवा सुविधा केंद्रातील ई-फायलिंग, ई-पेमेंट सुविधेचा त्याचबरोबर ई-लायब्ररी, ई-मुद्देमाल कक्षाचे पालक न्यायमूर्ती अरूण आर. पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पालक न्यायमूर्ती यांचा अल्पपरिचय लोहारा येथील दिवाणी न्यायाधीश एन. एस. सराफ यांनी करून दिला.

दिवाणी न्यायाधीश एम. एम. निकम यांनी, विधीज्ञ, पक्षकार व न्यायिक अधिकारी यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीद्वारे तसेच मुंबई उच्च न्यायालयाद्वारेे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सीआयएस, ई-कोर्ट मोबाईल अ‍ॅप, जस्टीस मोबाईल अ‍ॅप, डीजिटल कोर्ट अ‍ॅप, सीसीटीएनएस याबाबत माहिती दिली. तसेच ई-प्रणालीच्या कार्यध्दतीचा सविस्तर माहिती देवून न्यायालयीन कामकाजामध्येे त्याचा वापर केल्यास विधीज्ञ, पक्षकार, कर्मचारी व पोलीस यंत्रणेची कशी सोय होईल? याबाबत माहिती दिली.

यावेळी बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. एम. एस. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहदिवाणाी न्यायाधीशा एस. डी. कामत व जे. एस. गायकवाड यांनी केले. आभार आर. टी. इंगळे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायाधाीश के. ए. बागी-पाटील, व्ही. जी. मोहिते, मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. भदाणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही. एस. यादव, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. एस. माने, एस. एम. गोडसे, एस. डी. पाटील यांच्यासह न्यायालयातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

राज्यातील सर्वप्रथम उस्मानाबादला ई-फायलिंगचा मान

महाराष्ट्रात सर्वप्रथम उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये ई-सुविधा केंद्राचा उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्याने सर्वप्रथम ई-फायलिंगचा स्वीकार करून तो प्रत्यक्षात आणल्याने उस्मानाबादला ई-फायलिंगचा मान मिळाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा विधीज्ञ, पक्षकार, न्यायिक अधिकारी, सर्व कर्मचार्‍यांनी केल्यामुळे न्यायालयीन कामकाजात गतिमानता व अधिक पारदर्शीपणा येणार आहे. आधुनिकत काळात गतिमान न्यायिक प्रवाहात सर्वांनी सहभागी होणे काळाची गरज आहे, असे मत पालक न्यायमूर्ती अरूण आर. पेडणेकर यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात नऊशेपेक्षा अधिक ई-प्रकरणे दाखल

ई-प्रकरणे, ई-पेमेंट, ई-ग्रंथालय व ई-मुद्येमाल विभाग यांचा वापर केल्याने कशाप्रकारे वेळेची व कागदाची बचत होईल, याबाबत मनोगत व्यक्त केले. 3 डिसेंबर 2022 रोजी प्रथमत: ई-प्रणालीचे तुळजापूर येथील न्यायालयात सुरूवात करून 6 जानेवारी रोजी कळंब येथे ई-प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात ई-प्रणालीद्वारे न्यायालयीन कामकाज सुरू झाले आहे. तसेच विधीज्ञ व पक्षकारांचीही सोय होईल, असे सांगितले. तसेच जिल्ह्यातील ऑनलाईन ई-प्रणालीचा आढावा सांगताना संपूर्ण जिल्हाभरातील न्यायालयात नऊशेपेक्षा अधिक प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ई-पेमेंटद्वारे दंड, नक्कल प्रतींचे शुल्क, न्यायालयीन शुल्क विधीज्ञ व पक्षकारांकडून अदा करण्यात येत असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी सांगितले.
 

From around the web