महावितरण कार्यालयासमोर वीज कामगारांची निदर्शने

महाराष्ट्र वीज कामगार महासंघ व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची विविध मागण्यांसाठी द्वारसभा
 
g

उस्मानाबाद -वीज कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.23) महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. यावेळी रखडलेल्या मागण्या मान्य करुन न्याय देण्याची मागणी करत कामगारांनी जोरदार निदर्शने केली.

शासनाच्या विद्युत सुधार विधेयकाला आणि विशेषतः सबलायसनिंगला वीज कामगारांचा विरोध असून याबाबत भारतीय मजदूर संघाने केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्यासमवेत 2 फेब्रुवारी रोजही सविस्तर चर्चा करुन कामगारांची भूमिका स्पष्ट केली होती.परंतु एकीकडे राज्य सरकार केंद्राला विरोध करत असल्याचे दाखवते तर दुसरीकडे हा विषय केवळ राज्य सरकारशी संबंधित असताना खाजगीकरणाचा मुद्दा गतीने पुढे आणला जात आहे. महानिर्मितीची वीज जाणीवपूर्वक महाग करुन खाजगी कंपन्यांची तुलनेने स्वस्त वीज खरेदी करायची आणि महानिर्मितीचे जनरेशन सेट्स बंद करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही यावेळी वीज कामगार महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी केला.

त्याचबरोबर महावितरणमधील राजकीय हस्तक्षेप थांबवावा, हर घर दस्तक सारखे अभियान राबवून थकबाकीदारांची वीज तोडण्याचे उद्दिष्ट कामगारांना दिले जाते.  उद्दिष्ट पूर्ण न करणार्‍या कामगारावर कारवाईची धमकी दिली जाते. त्यातच मंत्री महोदयांकडून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश देतात. त्यामुळे वीज कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याचबरोबर अनुकंपा तत्वावरील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करावी, मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळेपर्यंत जो मासिक भत्ता दिला जातो, तो अतिशय तुटपुंजा असून त्यात भरीव वाढ करावी, रोजंदारीवर काम केलेल्या काळातील सेवा सलग सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावी, पन्नास वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर पदोन्नीती मिळाली असेल आणि ती अपरिहार्य कारणाने नाकारण्यात आली तर जी.ओ. 74 चा लाभ अबाधित राहावा, कंत्राटी वीज कामगारांना पूर्वीची एनएमआर पद्धत लागू करावी. उस्मानाबाद जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांचे दिवाळीपासून चे थकीत वेतन अदा करावे. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या द्वारसभेस महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उस्मानाबाद मंडळ सचिव विकास गाडेकर, मंडळ अध्यक्ष आनंद लिमकर, तुळजापूर विभागीय अध्यक्ष अमोल पवार, सचिव श्याम आबाचणे, उस्मानाबाद विभागीय अध्यक्ष दत्तूचंद बोंदर, सचिव विशाल गाडेकर, सहसचिव विनोद कुंभार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ उस्मानाबादचे प्रमुख पदाधिकारी सुशील उपळकर, किशोर पोतदार, रणजीत गाडे, प्रशांत दलाल, सोनबा गरड आदींसह महासंघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web