नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या मागण्या प्रशासनाकडून बेदखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकार्‍यांना दिला आंदोलनाचा इशारा
 
s

उस्मानाबाद -  वाशी तालुक्यातील सरमकुंडी फाटा येथे वास्तव्यास असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सुमारे पन्नास ते साठ कुटुंबांच्या झोपड्या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला असून शासनाकडून तात्काळ निवासाची तसेच अन्नधान्याची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्याच्या मागणीसाठी वाशी येथील तहसिलदारांना निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे  या कुटुंबांचा पंचनामा करुन अन्नधान्याची मदत व राहण्याची सुविधा न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (दि.6) निवेदनाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशीच्या तहसिलदारांना 2 जून रोजी  निवेदन देऊन अवकाळी पाऊस व वादळाचा फटका बसलेल्या सरमकुंडी फाटा येथील कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी केली होती. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे सरमकुंडी फाटा येथे वास्तव्यास असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी कुटुंबाच्या पन्नास ते साठ झोपड्या वार्‍याने उडून गेल्या. झोपडीतील अन्नधान्य, स्वयंपाक भिजून गेला. काहीजणांना पालाचे खिळे लागून जबर मार लागला. तर भांडीही वार्‍याने उडून गेली. त्यामुळे ही कुटुंबे रात्रभर चिखलातच बसून राहिली. सद्यस्थितीत आणखी काही दिवस वादळाचे व पावसाचे असल्यामुळे हे कुटुंबीय असुरक्षित आहेत. शासनाने पंचनामा करुन या कुटुंबांना अन्नधान्य तसेच राहण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, मनविसे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, अजय तांबीले यांच्यासह संजय शिंदे, भाऊराव शिंदे, तानाजी शेगर, सुनील शिंदे, विशाल शेगर, शिवाजी शेगर, युवराज शिंदे, रणजित पारडे यांची स्वाक्षरी आहे.
 

From around the web