ढेपे - सुभेदार प्रकरणी पोनि तानाजी दराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी 

 
police

उस्मानाबाद -   पत्रकार सुनील ढेपे आणि बाळासाहेब सुभेदार  प्रकरणात उस्मानाबाद पोलीस दलातील दहा पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  करण्याची मागणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

उस्मानाबादेत सन 2020 मध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या साहित्य संमेलनात झी २४ तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी पत्रकार सुनील ढेपे यांनी सोशल मीडियावर  'बिहारी बाबू, आता तरी जागे व्हा ' या मथळ्याखाली  सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले होते.

ही पोस्ट ढेपे यांचे मित्र बाळासाहेब सुभेदार ( सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते  ) यांनी सोशल मीडियावर शेयर केली होती.  त्यामुळे पोलिसांनी चिडून पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह  सुभेदार यांचे विरुद्ध आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये दि. १४ जानेवारी २०२० रोजी  पोलीस ( अप्रितीची भावना चेतवने)  कायदा 1922 चे  कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात  दोषारोपपत्र  दाखल केले होते. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रात पत्रकारांनी संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला होता. 


या एफआयआर आणि चार्जशीटला पत्रकार सुनील ढेपे व सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी  ॲड. सुशांत चौधरी यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्याच्या औरंगाबाद खंडपीठात दि. 16/02/2021 रोजी आव्हान दिले होते. कोरोनामुळे या आव्हान याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली होती. पण दीड वर्षानंतर या आव्हान याचिकेचा दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजी निकाल लागला असून, न्यायालयाने एफआयआर आणि चार्जशीट रद्दबातल ठरवले आहे आणि पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. 

राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार आणि पत्रकार  सुनील ढेपे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी उस्मानाबाद पोलीस दलातील दहा पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


त्यात सायबर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सपोनि ( सध्या तामलवाडी पोलीस स्टेशन ) सचिन अशोक पंडित, आनंद नगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण , पोलीस उपनिरीक्षक क्रांती सुधाकर ढाकणे, पो. कॉ.विठ्ठल सुखदेव गरड , पो. कॉ. माधवी म्हाळाप्पा व्हदरगंडे, पो. कॉ.अरविंद अंकुश ढेकणे, पो. कॉ. राहुल नागनाथ नाईकवाडी, पो. कॉ.मनोज महादेव  मोरे, पो. कॉ. सुनील सुखदेव मोरे, पो. कॉ. एम. के. कुलकर्णी यांचा समावेश आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सांगण्यावरून सायबर पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन अशोक पंडित यांनी आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये फिंर्याद दिली होती तर आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण यांनी गुन्हा नोंद केला होता. बाकी आठ पोलीस कर्मचाऱ्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना जबाब नोंदवण्यात आले होते. विशेष म्हणजे यातील अनेकांनी पोस्ट देखील वाचली नव्हती. दरम्यान राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उस्मानाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल करण्यास नकार 

 पत्रकार  सुनील ढेपे आणि  सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार  यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी तसेच मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सपोनि  सचिन अशोक पंडित यांच्यसह दहा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दि. १ / १०/ २०२२ रोजी तक्रार अर्ज दिला असता,  पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी गुन्हा नोंद केला नाही. 

त्यामुळे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे , सायबर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सपोनि ( सध्या तामलवाडी पोलीस स्टेशन ) सचिन अशोक पंडित आणि अन्य दहा पोलीसाविरुद्ध भादंवि १६६, १६६ ( अ ) , १६७, २१७ व २१८ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

d

s

s

s

From around the web