शरद पवार यांच्या हस्ते  समुद्रवाणी  प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील प्राथामिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणीपुरवठा व स्वच्छता,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) रोगजगार हमी, भूकंप पुनवर्सन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री सतिष चव्हाण, विक्रम काळे, संजय दौंड,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी राहुल गुप्ता,पोलीस अधिक्षक नीवा जैंन,आरोग्य उपसंचालक एकनाथ माले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडखे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी.के पाटील आदी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते दूर दृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून कळ दाबून करण्यात आले. पावणेचार कोटी रुपये खर्चून समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उभारण्यात आलेल्या या नूतन वास्तूचे लोकार्पण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.कोरोनाच्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सुविधा पोहोचवणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना धन्यवाद देत आरोग्य यंत्रणेच्या कामाचे कौतुक करत श्री.पवार यांनी आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अशाच प्रकारे रुग्ण सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

 राज्यातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक आरोग्य सेवा ग्रामीण स्तरापासून मिळावी हा शासनाचा मानस असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य जनतेस अत्याधुनिक आणि अद्ययावत आरोग्य  सुविधा देण्यासाठी राज्य शासन आणि आरोग्य विभाग कटीबद्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर आरोग्यवर्धिनीत केल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढल्या आहेत, असे सांगून श्री.टोपे  म्हणाले,राज्य शासनातर्फे खऱ्या अर्थाने आरोग्यसेवा गावांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. वेगवेगळ्या आरोग्य सुविधांसह आरोग्य तपासण्यासाठी या प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रांचा उपयोग होत आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लवकरच उपजिल्हा रुग्णालय स्तरावर एम आर आय तसेच तालुकास्तरावर सी टी स्कॅनची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

d

समुद्रवाणीच्या प्राथामिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. आकुबाई पाडोळी या पंचक्रोशीतील जनतेसाठी उभारण्यात आलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.आरोग्यवर्धनी या संकल्पनेमुळे आरोग्य केंद्रांना अद्ययावत सुविधा पुरविल्या जातील, असेही ते म्हणाले.

या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पंचक्रोशीतील जवळपास 51 हजार नागरिकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत.याठिकाणी विविध आजारांवर उपचार,महिलांच्या प्रसुती,तसेच छोट्या प्रकारच्या शस्त्रक्रीया आदी सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत.या आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे. लवकरच राज्य पातळीवर आरोग्य विभागात रिक्त पदांची भर्ती होणार आहे. त्यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उर्वरित रिक्त पदेही भरण्यात येतील. तसेच या आरोग्य केंद्रास संरक्षक भिंत आणि कर्मचारी निवासस्थान उभारण्यात येतील, असेही श्री.टोपे यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बोडके यांनी केले तर अस्मिता कांबळे यांनी आभार मानले.या कार्याक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

From around the web