सायबर गुन्हे, महिला सुरक्षेला प्राधान्य - पोलीस अधीक्षक कुलकर्णी 

 
spkulkarni

उस्मानाबाद -  जिल्ह्यात घडणारे सायबर गुन्हे रोखणे, महिला सुरक्षा जनजागृती यासह ग्राहक तक्रार दिनाचे आयोजन करुन नागरिकांशी संवाद ठेवत कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन नुतन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. ते जिल्हा पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, गुन्हेगारावर कायद्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करणार आहे. पोलिस जनता संबंध सुधारण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन महिन्यातील दोन शनिवारी होणार आहे. यात जिल्ह्यातील नागरिकांशी आपण स्वतः पोलिस अधिक्षक या नात्याने किंवा अति. पोलिस अधिक्षक संवाद साधणार आहोत.

सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच सायबर गुन्हे घडल्यास त्याचा तात्काळ तपास करुन ऑनलाईन आर्थिक लुट रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करुन जनतेला न्याय देणार आहे. महिला सुरक्षेबद्दल विविध उपक्रम सुरु करणार असून यात महिला, मुलींसाठी तक्रार पेटी तसेच महिला छेडछाडविरोधी कृती कार्यक्रमाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

बाहेर जिल्ह्यातील आरोपींवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच कम्युनिटी पोलिस या उपक्रमातंर्गत जिल्ह्यामधून बाहेर आलेल्या कैद्यांसाठी आणि त्यांच्यात मन परिवर्तन होवून त्यांना विविध व्यवसायिक कौशल्य रचनात्मक कार्यात जोडले जाणार आहे. यात इलेक्ट्रीक लाईट, सोलर यासारख्या व्यवसायाचे कौशल्य देणारे शिक्षण देवून त्यांना सन्मानाने उभे करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या वार्तालापाचे प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी केले तर आभार देविदास पाठक यांनी मानले. प्रारंभी त्यांना वृक्ष भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.


दरम्यान, सामाजिक कार्याची पार्श्‍वभूमी तसेच विशेष आवड असलेले पोलिस अधीक्षक कुलकर्णी हे 2015 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील असून त्यांचे सर्व शिक्षण बंगळुरु येथे झाले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कुलकर्णी यांनी स्पर्धा परिक्षेच्या माध्यातून पोलिस सेवेत प्रवेश केला आहे.

From around the web