छत्रपती संभाजीराजे अवमान प्रकरणी तुळजापुरात कडकडीत बंद
तुळजापूर - छत्रपती संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी आज ( गुरुवारी ) तुळजापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले.
छत्रपती संभाजीराजे यांचा तुळजापूर मंदिर प्रशासनाने केलेल्या अवमानाच्या निषेधार्थ तसेच मंदिर संस्थानचे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे, मंदिर व्यवस्थापक तहसिलदार योगिता कोल्हे यांना निलंबित करा, या मागणीसाठी आज तुळजापूर शहरात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिला असून शहर शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
संभाजीराजे छत्रपती हे सोमवारी संध्याकाळी कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी संभाजीराजे छत्रपती हे देवीच्या गाभाऱ्यात जात असताना मंदिर प्रशासनाने नियम दाखवत त्यांना रोखले. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. संभाजीराजे छत्रपतींच्या अवमानामुळे तुळजापूरकर संतप्त झाले आहेत. यामुळेच आज शहरवासियांनी तुळजापूर बंद पुकारला होता.
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीराजे हे सोमवारी संध्याकाळी कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. नियम सांगत व्यवस्थापनाने संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखले. यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.