तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात 14 ते 18 एप्रिलला चैत्र पौर्णिमा महोत्सव

 
d

उस्मानाबाद - श्री.तुळजाभवानी मंदिर येथे दि. 14 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत चैत्र पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  यात्रेस येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि यात्रा महोत्सव सुरळीतपणे आयोजित व्हावी. या दृष्टीकोनातून उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त सदस्य योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराशेजारील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

          यावेळी तहसीलदार तथा मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद नातू, शहर समन्वयक सुशांत गायकवाड,अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.बी. कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोदकुमार काकडे,  पोलीस उपनिरीक्षक श्री.कांबळे, मंदिर सुरक्षेचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन जाधव,पुजारी मंडळाचे सुधीर कदम आदी उपस्थित होते.

          यात्रेसाठी येणा-या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि यात्रा महोत्सव सुरळीतरित्या आयोजित व्हावी यासाठी मंदिर प्रशासन, नगर पालिका ,पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग,परिवहन विभाग,वीज वितरण कंपनी या सर्वांनी आपल्या जबाबदा-या चोखपणे पार पाडल्यास हा महोत्सव अत्यंत यशस्वीरित्या आयोजित होण्यास मदत होईल असे श्री.खरमाटे यांनी सांगितले.पाणी आणि वीज पुरवठ खंडित होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे,उन्हाळा असल्यामुळे नगर परिषदेने यात्रा काळात दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा करावा.शहरात आवश्यक सर्व ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करून त्याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. यात्रा कालावधीपूर्वी नगर परिषदेने पाणी पुरवठ करणा-या सर्व टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात ,असेही आदेश श्री.खरमाटे यांनी यावेळी दिले.

          गर्दी नियंत्रण,अतिक्रमण,पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था तसेच मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या दर्शन व्यवस्थेचा मार्ग आराखडा अथवा बॅरिकेटिंगसाठी तहसीलदार, पोलिस निरिक्षक,मुख्याधिकारी नगर परिषद आणि व्यवस्थापक(प्रशासन)यांनी संयुक्तरित्या नियोजन करावे. शहरातील अतिक्रमणे दोन दिवसात हटवण्याची प्रक्रीया नगर परिषदेने करावी, यासाठी पोलीस प्रशासनाने न.प ला आवश्यक ती मदत करावी, तसेच पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नियोजन करतांना व्यापारी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही यास प्राधान्य द्यावे, असेही श्री. खरमाटे यांनी यावेळी सांगितले.

श्री.खरमाटे म्हणाले की आरोग्य विषयक बाबींवर ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद आणि अन्न व औषध प्रशासनाचे फार महत्वाचे योगदान असते. शहराकडे येणा-या रसत्यावरील विहीरी आणि बोअरवेल यांचे निर्जंतुकीकरण करावे.हॉटेल्स आणि खानावळ येथील अन्न पदार्थांची संपूर्ण तपासणी करावी. विशेषत: पाण्याच्या बाटल्या तपासावेत, कारण जुन्या बाटल्यांमध्ये अस्वच्छ पाणी विक्री होण्याची दाट शक्यता असते.भाविकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने मंदिरासमोरील मैदानावर वैद्यकीय सेवा कायमस्वरूपी सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केले.

सुरक्षा आणि दक्षता तसेच मंदिरातील शिस्तीबाबत मार्गदर्शन करतांना श्री.खरमाटे म्हाणाले, मंदिराबरोबर शहरातही पोलीस बंदोबस्त अलर्ट असणे आवश्यक आहे.विशेषत: चर्णतिर्थ,छबीना, अभिषेक,पूजा याप्रसंगी बंदोबस्त चोख असावा,मंदिरात अनुभवी पोलीस आणि महिला कर्मचारी नेमावेत.तसेच मंदिरात येणारे सर्व पुजारी आणि पोलीस कर्मचा-यांनी भाविकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना देण्यात याव्यात,शिवाय तज्ञांमार्फत संबंधितांना प्रशिक्षणही देण्यात येईल असेही श्री.खरमाटे यांनी यावेळी सांगितले.

From around the web