रमाई घरकुल योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी  देऊन आणि वाढीव निधी द्या

समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे मागणी
 
s

उस्मानाबाद  :     रमाई घरकुल आवास योजनेसाठी  लाभार्थ्यांनी  सादर केलेले प्रस्ताव मंजुर करावेत. तसेच घर बांधकाम साहित्याचे वाढलेल्या  महागाई मुळे रमाई घरकुल आवास योजनेच्या निधी मध्ये वाढ करण्याची मागणी  जिल्हा नियोजन समिती सदस्य , .नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांनी समाज कल्याण आयुक्त डॉ .प्रशांत नारनवरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे हे उस्मानाबाद येथे सोमवार 19 सप्टेंबर रोजी  त्यांच्या शासकीय दौऱ्यावेळी निवेदन देण्यात आले.  उस्मानाबाद जिल्हयात  रमाई घरकुल आवास योजने साठी पात्र लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यलयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र हे प्रस्ताव मंजुरी अभावी पडून आहेत.  त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी.

    समाज कल्याण कार्यालया मार्फत नगर परिषदेच्या अंतर्गत   2800  घरकुल मंजूर केले आहेत.  परंतु निधी अभावी  अनेक घरकुलांची कामे अर्धवट  अवस्थेत आहेत.सध्या पावसाळ्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.  रमाई घरकुल योजना शहरी साठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळते.  परंतु वाढलेल्या महागाई मुळे वाळू, खडी, सिमेंट, स्टील, वीट, मजुरी  यांचे दर दुप्पट वाढल्याने अनुदान तुटपुंजे आहे. तरी हे अनुदान पाच लाख करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. या  निवेदनावर  सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, संजय गजधने, गणेश वाघमारे, सचिन धकतोडे, प्रदीप माळाळे, राहुल बनसोडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.

From around the web