महिलामध्ये सुरक्षितता आत्मविश्वास निर्माण करा  - अस्मिता कांबळे

 
s

उस्मानाबाद -सामाजिकदृष्ट्या महिला सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा, महिला शक्तीचा सन्मान करा, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी काल येथे केले.

       भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उस्मानाबाद येथे जन भागीदारी के 7 साल या विषयावरील चित्रप्रदर्शन आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती कांबळे बोलत होत्या.

       या चित्रप्रदर्शनाचे  उद्घाटन श्रीमती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता, बालकल्याण सभापती  शोभा टेकाळे, सभापती  हेमा चांदणे, नेहरू युवा केंद्राचे माजी राज्य संचालक प्रमोद हिंगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निपानिकर,अग्रणी बँकेचे निलेश विजयकर, नाबार्डचे चैतन्य गोखले, शोभा कुलकर्णी माजी क्षेत्रीय प्रचार अधिकारी  सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

        सदरील चित्र प्रदर्शनास जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्या उषा यरफळ यांनी भेट देऊन पाहणी केली.

s

          यावेळी बोलताना अस्मिताताई कांबळे यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी तीन टक्के निधी राखीव ठेवणार असल्याचे सांगितले. उस्मानाबाद हा आकांक्षीत जिल्हा असून त्याला प्रगती पथावर आणण्यासाठी आणि आत्मनिर्भर होत महिला बचत गटाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत जिल्ह्यातील महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. जिल्ह्यांचा निर्देशांक वाढवण्यासाठी महिलांनी गावागावात आत्मविश्वासानं कार्य करावे. महिलांना संगणक साक्षर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आगामी काळात महिलांसाठी संगणक प्रशिक्षण वर्ग घेण्याचं तसेच या माध्यमातून महिला मध्ये आर्थिक साक्षरता तसेच डिजिटल साक्षरता करणार असल्याचे अस्मिता कांबळे यांनी सांगितले.

  जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेतून जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

      प्रमोद हिंगे यांनी महिलांनी स्वतःच्या अंगी असलेल्या क्षमतांना ओळखून मी कोण आहे? माझ्याकडे संवाद कौशल्य असले पाहिजे माझ्याकडे श्रवण कौशल्य असले पाहिजे माझ्याकडे इतरांना पटवून देण्याची क्षमता असली पाहिजे अद्यावत ज्ञान असण्यासह एकाग्र बुद्धी ह्या  कौशल्य गुणांचा अंगीकार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

          जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता यांनी केंद्र सरकारच्या वतीने लावण्यात आलेले जन भागीदारी के 7 साल चित्र प्रदर्शन अतिशय उत्कष्ट असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांमध्ये महिलांना प्राधान्य दिले जात असून आगामी अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजना घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितलं.

          यावेळी विविध बँकाच्यावतीने बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी पाच कोटी रुपयांची कर्ज मंजुरीचे पत्र आणि धनादेश मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आले.तसेच यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

          यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे वैद्यनाथ अरूर, एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक अनिल रस्तोगी, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक पराग अंबेवडिकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्य व्यवस्थापक विजयकुमार फटके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अंकुश चव्हाण यांनी केले. वनमाला सावंत व किशोर टोंपे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.बलविर मुंढे, जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड,गोरख भांगे, अमोल शिरसाट, पूजा पडवळ, जे.एम.हन्नुरे यांनी प्रयत्न केले. या महिला मेळाव्याला जिल्ह्यातील उमेद या महाराष्ट्र  जीवनोन्नती ग्रामीण अभियानाच्या गावागावातील  बचत गटाच्या असंख्य महिला उपस्थित होत्या. हे चित्र प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे.

                                                          
 

From around the web