दीड हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी भूमचा कनिष्ठ सहाय्यक गजाआड
भूम - एका सेवानिवृत्त झालेल्या मैल कामगाराचे सुधारित वेतन निश्चितीमधील फरकाचे बिल काढण्यास साहेबांची सही आणतो म्हणून दीड हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या भूमच्या लाचखोर कनिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडून गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत उप विभाग, भूम येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले राजश्री उत्तमराव शिंदे (वय ४० वर्ष) यांनी तक्रारदार यांचे वडील हे मैल कामगार म्हणून २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले.
त्यानंतर २०२१ मध्ये त्यांची सुधारित वेतन निश्चितीचे आदेश काढण्यात आले होते. या सुधारित बिलाच्या फरकाची फरकाची ९१ हजार २५७ रुपये रकमेच्या चक्रवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपी शिंदे यांनी तक्रारदाराकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. ती लाचेची मागणी पंचा समक्ष मागणी करुन स्विकारली. तर लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून शिंदे यास दि.१४ मार्च रोजी रंगेहात पकडून गजाआड केले आहे.
ही कामगिरी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपत्ती यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. या पथकामध्ये उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोअ दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके यांचा समावेश होता.
दरम्यान, कोणताही शासकिय अधिकारी, कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे फोन क्रमांक- ०२४७२- २२२८७९ तसेच पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते मो. नं.- ९५२७९४३१००, अशोक हुलगे मो नं.- ८६५२४३३३९७ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.