भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासह चौक सुशोभीकरण कामास लवकरच सुरुवात
तुळजापूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण कामास दि. २३/०३/२०२२ रोजी झालेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह चौक सुशोभीकरण कामास लवकरच सुरुवात होणार आहे.
तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत श्री क्षेत्र तुळजापूर मंदिर, मंदिर परिसर व शहर विकासाकरिता रु. ३१५ कोटी इतक्या रकमेच्या आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये शहरातील मुख्य चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी रुपये २०० लक्ष निधीची तरतूद करण्यात आली होती. यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण करण्यासाठी केलेली तरतूद पर्याप्त नसल्यामुळे व यात अनेक बाबी अंतर्भूत नसल्यामुळे या कामाचे रुपये ८७.३० लक्ष किमतीचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र सुधारित अंदाजपत्रकीय किंमत मूळ प्रशासकीय मान्यतेच्या ३० % पेक्षा जास्त असल्याने शासनाच्या मान्यतेकरीता प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्यानुसार सदर प्रस्तावास शासनाची मान्यता मिळवून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. शासनाकडून मान्यता प्राप्त होताच दि. २३/०३/२०२२ रोजी झालेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण कामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नगर परिषदेमार्फत चौक सुशोभीकरण कामासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे.