तेरणा संदर्भातील न्यायालयीन लढ्याला भैरवनाथ समूहाचे सर्वेसर्वा आ.तानाजीराव सावंत यांना यश
उस्मानाबाद - कर्ज वसुली न्यायाधिकरणापुढे (डी.आर.टी.) सुरू असलेल्या लढाईत यश येऊन तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भैरवनाथ समूहास भाडेतत्वावर चालविण्यास घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्री अमित देशमुख यांच्या ट्वेंटी वन शुगर्सची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
कर्जामुळे अडचणीत सापडलेला ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेवरुन ट्वेंटी वन शुगर्सने भैरवनाथ उद्योग समूहाच्या निविदेला आव्हान दिले होते. कर्ज वसुली न्यायाधिकरणाने भैरवनाथ समूहाला देण्यात आलेली निविदा योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भैरवनाथ समूहाला भाडेतत्वावर चालविण्यासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
तेरणा साखर कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला नसता तर ऊसाचे गाळप सुरु होऊन शेतकर्यांची अडचण दूर झाली असती. काहीजणांनी खोडा घालून कारखाना सुरु होऊ नये यासाठी प्रयत्न केले. असे झाले नसते तर यावर्षी निर्माण झालेला अतिरिक्त ऊसाचा प्रश्न देखील सुटू शकला असता. त्यामुळे आता तेरणा साखर कारखान्याच्या मार्गात खोडा घालण्याचे पाप कोणी करु नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.