कोरोना काळातील आशाताईंचे योगदान अविस्मरणीय

- डॉ.भारती पवार
 
as

उस्मानाबाद - आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात डॉकटर्स,नर्सेस  आणि आरोग्य सेवकांबरोबरच आशा कार्यकर्तींनी केलेल्या कामामुळे कोव्हिड-19 या विषाणूवर प्रतिबंध आणण्यास देशाला यश मिळाले आहे.आज जगभरात भारताच्या “आशा पॅटर्न”चे कौतूक होत आहे. जगातील अनेक आरोग्य संस्था आशाताईच्या काम करण्याच्या शैलीचा अभ्यास करत आहेत. म्हणूनच कोरोना काळातील आशाताईंचे योगदान अविस्मरणीय आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज येथे केले.

 पुष्पक मंगल कार्यालय येथे आयोजित आशा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी डॉ.पवार बोलत होत्या.यावेळी आमदार राणा जगजीतसिंह पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जाधव ,जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

as

डॉ.पवार म्हणाल्या, कोरोना साथीत घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का? वयोवृद्ध लोकं कोणत्या घरात राहतात, त्यांना कोणते आजार आहेत का? याचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले, होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना रूग्णाला कोणती लक्षणे दिसतायेत याबाबत दररोज माहिती घेतली, आरोग्य केंद्रावर लोकांना तपासणीसाठी आणण्याचे काम केले, लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरण केंद्रांवर मदतीचे कामे करणे, ही कामं आशा स्वयंसेवकांनी कोरोना काळात केली.तसेच साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे, जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अशा जबाबदा-या आशा स्वयंसेविकांनी अचूकपणे पार पाडल्या.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 1244 आशा कार्यकर्त्यांनी आणि 61 गट प्रवर्तक यांनी त्यांना मिळणारे भत्ते आणि मानधन वाढीबाबत केलेल्या मागणीबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवेन. तथापि, आशा सेविकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना,प्रधानमंत्री सुरक्षा योजना यांचा लाभ घ्यावा, तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेतून पेन्शन घेता येते. आपण देशासाठी आशेची किरणं आहात,तुमच्या कार्यामुळे आज अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहचत आहेत आणि त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. असेही डॉ.पवार म्हणाल्या.यावेळी डॉ. भारती पवार यांनी आशा कार्यकर्तीसोबत व्यक्तीश: चर्चा केली आणि संवाद साधला तसेच त्यांच्या कार्याचे कौतूक करत शुभेच्छाही दिल्या.

From around the web