प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या भाजपच्या नुपूर शर्मा हीस तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करा

उस्मानाबादेतील मुस्लीम समाजबांधवांचे राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन
 
sd

उस्मानाबाद  -  इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवी दिल्लीचे भाजपा मीडियाप्रमुख नवीन जिंदाल यांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने देशाचे राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 


निवेदनात म्हटले की, भारतीय जनता पार्टीची नुपूर शर्मा हिने एका वृत्त वाहिनीवर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जाणीपूर्वक आक्षेपार्ह व अवमानकारक विधान करुन समस्त मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावणारे कृत्य केले आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जातीयवादी भारतीय जनता पार्टीकडून वारंवार केला  जात असून देशात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी जाणीवपूर्वक करीत आहेत. त्यामुळे धर्माचा अवमान करणारे असे कृत्य मुस्लीम समाज कदापि सहन करणार नाही.

देशात कानपूर व इतर भागात नुपूर हिच्या वक्तव्यामुळे हिंसक आंदोलने होत आहेत. तसेच भारत देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नाचक्की झालेली असून अनेक देशांनी नुपूर हिच्या हीन वक्तव्याची कठोर शब्दात निंदा करुन निषेध नोंदवला आहे. नुपूर शर्मा हिने जाती-जातीमध्ये द्वेष पसरविण्याच्या उद्देशानेच हे वक्तव्य केलेले असून तिच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिक सलोखा, भाईचारा संपुष्टात येऊन दोन धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. 

देशात जातीधर्मावर टिकाटिप्पणी आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. त्यामुळे असे निंदाजनक वक्तव्य करणार्‍या लोकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. राष्ट्राची एकात्मता कायम ठेवण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करुन देशात यापुढे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही धर्माविषयी अथवा महापुरुषांविषयी निंदाजनक वक्तव्य करण्याचे धाडस करु नये याकरिता कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. 

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लीम धर्माच्या भावना दुखावण्याचा तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी भारतीय जनता पार्टीची निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा आणि तिचे समर्थन करणारा भारतीय जनता पार्टीचा नवीन जिंदाल या दोघांना अटक करुन कठोर कारवाई करावी, तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

d

निवेदनावर मसूद शेख, खलील सय्यद , समीयोद्दीन मशायक, खलिफा कुरेशी, असलम शेख, बिलाल तांबोळी, आयाज शेख, निजामोद्दीन मुजावर, बिलाल रजवी, अकबर पठाण, फैजान काझी, इस्माईल काझी, कादर खान, अ‍ॅड.जावेद काझी, वाजीद पठाण, शहेबाज शेख, मौलाना जाफर, असद पठाण, साजीद सय्यद, आरेफ शेख, शजियोद्दीन शेख, मेहराज बागवान, इम्तियाज बागवान, बाबा फैजोद्दीन शेख, हाजी खयामोद्दीन, मौलाना अहमद, जाकेर पठाण, गयास मुल्ला, अल्लानूर शेख, जुल्फेकार काझी, एजाज काझी, बाबा मुजावर, फेरोज शेख, फेरोज पल्ला यांची स्वाक्षरी आहे.

From around the web