रुढीपरंपरेला छेद देऊन स्त्रीयांना सन्मानाने जगण्याचे बळ अहिल्यादेवींनी दिले - अॅड. दिगंबर खोत
उस्मानाबाद - पती निधनानंतर सती प्रथेला मूठमाती देऊन मराठा साम्राज्यातील मावळ प्रांताचा कारभार पाहताना स्त्रीयांना सन्मानाने जगण्याचे बळ तीनशे वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी दिले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून प्रत्येकाने त्यांच्या विचार कृतीत आणावेत, असे प्रतिपादन अॅड.दिगंबर खोत यांनी केले.
जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज (दि.31) साजरी करण्यात आली. याप्रसंगी अॅड.खोत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याविषयी विचार व्यक्त केले.
अहिल्यादेवींनी मराठा साम्राज्यात केलेले समाजकारण, धर्मकारण अशा बाबींवर त्यांनी संदर्भासह सविस्तर विवेचन करुन अहिल्यादेवींचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडला. ते म्हणाले की, जन्माला आल्यानंतर आपल्या वाट्याला आलेले कर्म करत असताना समाजाचा उद्धार कसा करावा, स्त्रीयांना समानतेचा दर्जा, अस्पृश्यता निवारण अशा कार्याचा सिद्धांत त्यांनी मांडला. साधूसंतांना जन्म देणार्या स्त्रीचे अवमूल्यन का व्हावे? हे त्यांनी त्या काळी ओळखले होते. देशातील काशी विश्वेश्वरासह शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करुन त्यांनी धर्मरक्षणाचे काम केल्याचेही अॅड.खोत म्हणाले.
कार्यक्रमात अॅड.पांडुरंग लोमटे यांनीही विचार व्यक्त केले. पती आणि पुत्राचा वियोग सहन करत त्यांनी साम्राज्याची धुरा नेटाने सांभाळत पुढच्या पिढ्यांना आदर्श घालून दिला असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.प्रवीण रामेश्वर शेटे यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड.खंडेराव चौरे, अॅड. पांडुरंग लोमटे, अॅड. रमेश सूर्यवंशी, अॅड.विशाल साखरे, अॅड. नंदू जकाते, अॅड.अंगद नाईकवाडी, अॅड.अरुणा गवई, अॅड.महादेवी उंबरे, अॅड.कल्पना निपाणीकर, अॅड.मदन जमाले, अॅड.शैलेंद्र यावलकर, अॅड.गाजरे, अॅड.बादुले आदीसह विधिज्ञ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.