चिमुरडीवर अत्याचार करणारा आरोपी सराईत...

फाशीची शिक्षा करण्याची शिफारस महिला आयोग करणार - रूपाली चाकणकर

 
z

उस्मानाबाद -  तुळजापूर तालुक्यातील एका खेडेगावात ६ वर्षीय  चिमुकलीवर झालेला अत्याचार अत्यंत निंदनीय आहे.  ही दुर्दैवी घटना असून यापूर्वी या व्यक्तीला ३७६ कलमान्वये ६ वर्षाची शिक्षा झालेली होती. तर ३५९ कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. हा गुन्हेगार लैंगिक गुन्हे करण्यात सराईत असल्याने तो समाजात राहण्याच्या लायकीचाच नाही. त्यामुळे राज्य महिला आयोगाने त्यास फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दि.२ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

तुळजापूर तालुक्यातील  एका ६ वर्षीय चिमुकलीवर सराईत असलेल्या गुन्ह्यागाराने पाशवी अत्याचार  केला आहे. त्या चिमुकलीवर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्या बालिकेच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैशालीताई मोटे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय पाटील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. स्मिता गवळी-सरोदे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, ऍड मनीषा राखुंडे, अनिता गरड, बाल कल्याण समितीच्या सदस्या कुदळे, भोसले, जहागिरदार आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याचा तत्परतेने तपास पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून १५ दिवसांच्या आत चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येणार असून त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल या दृष्टीने पावले उचलण्यात येतील. पिडीतेला न्याय देण्यासाठी महिला राज्य आयोग प्रयत्नशील असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तपासामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. तसेच आरोपीचा मोबाईल पोलिसांना सापडलेला असून त्याच्या मोबाईलमध्ये बलात्कार करतानाचे चित्रीकरण रेकॉर्डिंग केले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात अपहरण, बलात्कार यासह आयटी कायद्याखाली गुन्हा  नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्याखाली ६ वर्षाची शिक्षा भोगून आलेला आहे. तर कलम ३५४ म्हणजे विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे. त्यामुळे तो आरोपी क्रूर असल्याचे सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


महिलांवरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी गृह विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अत्याचार रोखण्यासाठी कायदे चांगले आहेत. परंतू त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. याबाबत विचारले असता त्या म्हणाले की समाजाने देखील याबाबत सजग असणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण एकटी पोलिस यंत्रणा यासाठी अपुरी असून समाजातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


समाजातील व्यक्ती उच्च शिक्षण घेत आहेत व घेतलेल्या आहेत. तरी देखील अजूनही समाज सुशिक्षित आहे का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण समाजामध्ये वारंवार अशा घटना घडूच नयेत यासाठी निश्चितपणे समाजाने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक असून समाजामध्ये लायक नसलेल्या व्यक्तींना राहण्याचा अधिकार नाही. विशेष म्हणजे एकीकडे देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ मुर्मू घेतात तर दुसरीकडे महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होतात हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.


भाजपच्या चित्रा वाघ यांच्या बाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, काही लोक राजकीय पद्धतीने वागतात. ते आता सत्तेवर असून याबाबत ब्रशब्द करीत नाहीत.त्यांच्या या दुटप्पी भूमिकेचे जनता त्यांना नक्कीच उत्तर देईल असा मार्मिक प्रहार वाघ यांच्यावर केला.

From around the web