शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग 

 
s

उस्मानाबाद - येथील वैद्यकीय महाविद्यालयाची जागा निश्चित होऊन तेथे प्रत्यक्षात महाविद्यालय इमारतीचे बांधकाम सुरु होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची समिती (NMC) ३० एप्रिल पर्यंत भेट देऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचेअधिष्ठाता डॉ. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून बैठक घेतली.

 

वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी लागणारे वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातील सामंजस्य करार, आवश्यक प्राध्यापक, सपोर्टींग स्टाफ यांची भरती इत्यादी बाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच महाविद्यालय सुरु करावयाच्या इमारतीमध्ये व्याख्यान कक्ष/ वर्ग खोल्या, विविध प्रयोगशाळा तयार करण्यासाठी आवश्यक जागा तयार करणे तसेच उपकरणे खरेदीबाबत देखील चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची जागा हस्तांतरित करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सामंजस्य करार होणे अपेक्षित आहे. सदर प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे अद्याप प्रलंबित आहे, या प्रक्रियेस गती देण्यासाठी व्यक्तीश: पाठपुरावा करण्याचे ठरले.

 

तसेच पाहणी दरम्यान इमारतीत अस्वच्छता व इतरही गैरसोयीच्या बाबी निदर्शनास आल्या. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत साफ सफाई करण्याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. यलगट्टे व स्वछता निरीक्षक श्री. कांबळे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. कालपासून स्वच्छतेचे कामही सुरू झाले असून ७ दिवसात पूर्ण इमारत व परिसर स्वछ करून देण्याचे मुख्याधिकारी यांनी मान्य केले आहे. पदभरती बाबतची कार्यवाही देखील वेगाने अनुसारण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. MUHS च्या नियमानुसार महाविद्यालय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. 

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष .नितीन काळे यांच्यासह अधिष्ठाता डॉ.राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, डॉ.सचिन देशमुख, डॉ. मुल्ला, सा.बां.विभाग कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण, उपअभियंता श्री.खंडागळे, शाखा अभियंता श्री.शिवगुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.यळगट्टे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे  प्राचार्य श्री. वाघमारे आदी उपस्थित होते.

From around the web