देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांचा  उस्मानाबादेत भव्य मेळावा

 
w

उस्मानाबाद - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशातील गोवा मुक्तिसंग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम, ब्रिटिश व पोर्तुगाल यांच्याविरुद्ध लढा देणार्‍या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा उस्मानाबाद येथे दि.26 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10.30 वाजता हा मेळावा होत आहे.

या मेळाव्यास अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष डी. पंपन्ना (रायचुर, कर्नाटक) हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सरचिटणीस तथा सचिव धर्मवीर पालीवाल (सोनपत, हरियाणा), उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे व प्रा. डॉ. सतीश कदम, सर्वोच्च न्यायालयाचे निष्णात विधीज्ञ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र व राज्य सरकार मोठ्या थाटामध्ये साजरा करीत आहे. मात्र ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. अशा स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्यांच्या वारस पत्नी किंवा मुलांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांची उकल करण्यासाठी तसेच तरुण व भावी पिढीला देशाचा इतिहास काय होता ? याची माहिती व्हावी.  या उद्देशाने चिलवडी येथील स्वातंत्र्य सैनिकांनी देशभरातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र आणून त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी व स्वातंत्र्याचा खरा इतिहास सर्वांना माहीत व्हावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या वारस पत्नी व मुलांच्या विविध प्रश्नांवर उहापोह करण्यात येणार आहे.

या मेळाव्या दरम्यान, स्वातंत्र्य लढ्यातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेळाव्याचे स्वागताध्यक्ष तथा स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे माजी सदस्य सचिव विष्णूपंत धाबेकर, स्वातंत्र्यसैनिक वारसदार बुबासाहेब उर्फ यशवंतराव जाधव, शीला उंबरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
 

From around the web