बालरुग्णांसाठी तीन खाजगी रुग्णांलयातील 30 खाटा राखीव

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आदेश
 
corona

उस्मानाबाद - कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील तीन खाजगी रुग्णालयातील 30 खाटा बालरुग्णांसाठी अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले. 

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये आणि Management Of Suspect, Confirmed Cases of COVID-19 मधील मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन खाजगी रुग्णालयाच्या इमारती आरोग्य विभागाच्या अधिनस्त “Dedicated Pediatric Covid Hospital” म्हणून स्थापन करुन पुढील आदेशापर्यंत अधिसूचित आणि अधिग्रहीत करण्यात येत आहेत.

उमरगा तालुक्यातील बिराजदार हॉस्पीटल (डॉ.नामदेव डि.बिराजदार) एकूण खाटांची संख्या 32 पैकी कोविड बाल रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या खाटांची संख्या 10, जाधव हॉस्पीटल (डॉ.विनोद बी.जाधव) एकूण खाटांची संख्या 10 पैकी राखीव खाटांची संख्या 10 आणि उस्मानाबाद तालुक्यातील वात्सल्य चाईल्ड केअर-आय.सी.यू. (डॉ.मुकुंद माने) एकूण खाटांची संख्या 35 पैकी राखीव खाटांची संख्या 10 असे एकूण तीन रुग्णालयांतील 30 खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शक सूचनांनुसार यंत्रणा स्थापन करुन संनियंत्रण करावे तसेच ही माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करण्यात यावी. “Dedicated Pediatric Covid Hospital” मध्ये नियंत्रण करण्याची सर्वसाधारण जबाबदारी आणि “Dedicated Pediatric Covid Hospital” चे नोडल अधिकारी म्हणून जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी हे काम पाहतील. महाराष्ट्र शासन ,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून देण्यात आलेल्या आणि देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. असे जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी या आदेशात म्हटले आहे.
 

From around the web